प्रश्नांचा भडिमार : उपाध्यक्षांसह चार संचालक बसले सभासदात उमरखेड : तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याची आमसभा मंगळवारी चांगलीच गाजली. कारखाना सुरू करणे, कामगारांचे पगार, उसाचे थकीत पैसे यासह ऊस उत्पादकांनी केलेला निषेध आणि उपाध्यक्षांसह चार संचालकांनी सभासदात बसणे पसंत केल्याने एकच गदारोळ झाला. वसंत सहकारी साखर कारखान्याची ४५ वी वार्षिक आमसभा कारखान्याचे अध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला कार्यकारी संचालक गिरीष लोखंडे यांनी अहवाल वाचणास सुरुवात केली. त्यावेळी राम देवसरकर, भीमराव चंद्रवंशी, अॅड. माधवराव माने, संजय देवसरकर, चितांगराव कदम यांनी आक्षेप घेतला. लेखी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी सर्वांनी केली. त्यावर प्रश्नउत्तरे सुरू झाली. त्यात काही सभासदांनी कारखाना केव्हा सुरू करणार, उसाचे थकीत पैसे तत्काळ द्या, अशी मागणी केली. सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दीक चकमकही उडत होती. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. अनेकांनी अध्यक्षांवर प्रश्नांचा भडीमार करून त्यांना धारेवर धरले. गोंधळ वाढत असल्याने अध्यक्षांनी आमसभा संपल्याचे जाहीर केले. वसंत कारखान्याची आमसभा रितसर न घेता अध्यक्षांनी संपली असे जाहीर केले. त्यावेळी अनेक सभासदांनी आरडाओरड केली. ऊस उत्पादकांमध्ये प्रचंड रोष दिसून आला.कारखान्याचे उपाध्यक्ष पंडितराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली याच ठिकाणी विरोधात सभा घेण्यात आली. यावेळी शाम देवसरकर, अॅड. माधवराव माने, भीमराव चंद्रवंशी, चितांगराव कदम, सविता कदम, अॅड. आदित्य माने, बालाजी वानखडे, डॉ.कल्याण राणे, डॉ. गणेश घोडेकर, विकास चव्हाण, संजय देवसरकर, भाऊराव चव्हाण, डॉ. अनिल कनवाळे, राहुल वानखडे आदी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कारखान्याचे माजी अध्यक्ष तातू देशमुख, राजन मुखरे, बालाजी उदावंत, आर.डी. राठोड, कृष्णापाटील देवसरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
‘वसंत’च्या आमसभेत गदारोळ
By admin | Updated: October 1, 2015 02:28 IST