मोहदी : शासनाकडून प्रत्येक वर्षी पीककर्ज वाटप मोहीम राबविली जाते. पण काही शेतकऱ्यांना कर्जच मिळत नसल्याचे समोर आले आहे. कमी जमीनधारक शेतकऱ्यांना अल्प पीक कर्ज लवकर मिळते. पण अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसते. परिणामी गत तीन वर्षांपासून काही शेतकरी कर्जापासून वंचित आहेत.पीक कर्जाचे पुनर्गठण केले जात आहे. पण तीन वर्षांपेक्षा अधिक काळापासून कर्जाची परतफेड न करू शकलेल्या शेतकऱ्यांना कर्जच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. या वंचित शेतकऱ्यांची संख्या ६० टक्के असल्याचेही सांगण्यात येत आहे. सतत तीन वर्षे पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी असल्यास दुष्काळी परिस्थिती जाहीर केली जाते. यामुळे सक्तीची कर्ज वसुली थांबविली जाते. पण शेतकरी सावरेल याची शाश्वती नसते. खरीप पीककर्ज वाटप सुरू आहे. पण याचा लाभ नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच होत आहे. तीन वर्षापेक्षा अधिक काळापासून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहे. कमी शेती असलेल्यांच्या तुलनेत अधिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांचा खर्चही अधिक असतो. परिणामी सधन शेतकऱ्यांवर गंडांतर येत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जमीन विकण्याचा सपाटा लावला. (वार्ताहर)
तीन वर्षांपासून शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत
By admin | Updated: July 8, 2016 02:33 IST