यवतमाळ : यावर्षी जिल्ह्यातील ३२७ गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दोन कोटी ८८ लाख रूपयांच्या कृती आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. जिल्हा परिषदेचा पाणीटंचाई विभाग, नैसर्गिक आपत्ती विभाग, आणि भूजल सर्वेक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेल्या अहवालास जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंंह यांनी मंजुरी दिली आहे. ३२७ गावामध्ये पाणीटंचाई भीषण होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारण्यासाठी जिल्हा प्रशासनाला दोन कोटी ८८ लाख रूपये लागणार आहेत. यामध्ये प्रगतीपथावरील योजना पूर्ण करणे, विंधन विहिरी अधिग्रहित करणे, तात्पुरती पूरक नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती करणे, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे, वुडक्या झिऱ्या घेणे, टँकर आणि बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे आदींचा यामध्ये समावेश आहे. जानेवारी ते मार्चअखेरपर्यंत ७० गावांमधील उपाययोजना करण्यात येणार आहे. याकरिता एक कोटी ९६ लाख रूपये लागणार आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत २५७ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर उपाय योजना होणार आहेत. २३७ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या कामाकरिता ७३ लाख ५६ हजार रूपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. २५ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडावर पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्याकरिता १८ लाख ३० हजारांचा खर्च होणार आहे. (शहर वार्ताहर) २६ गावांमध्ये बैलगाडीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या कामावर ९० हजार रूपयांचा खर्च करण्यात येणार आहे. या कालावधीत १४ तात्पुरत्या पूरक नळयोजना दुरूस्त करण्यात येणार आहे. या कामावर ४६ लाख ५० हजार रूपयांचा खर्च होणार आहे. ५२ गावामधील ५२ विशेष नळ योजनेच्या दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामावर सर्वाधिक एक कोटी ४७ लाख ८० हजारांचा खर्च करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ३२७ गावांवर भीषण पाणीटंचाईचे सावट
By admin | Updated: March 8, 2017 00:09 IST