रोजगाराचा शोध : काम मिळविण्यासाठी धडपडवणी : गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमधील कामगारांच्या टोळ्या वणीत दाखल होत आहेत. छत्तीसगडमध्ये असलेली रोजगाराची वाणवा आणि श्रमाच्या मोबदल्यात आवश्यक मजुरी मिळत नसल्याने हे कामगार कामाच्या शोधात या परिसरात भटकंती करीत आहेत. शनिवारी सकाळी जवळपास ४४ छत्तीसगडी कामगारांची एक टोळी वणीत दाखल झाली. हे सर्व जण दिंडोरी येथील रहिवासी आहेत. मुख्य मार्गावरील झाडांच्या आश्रयाने आपल्या चिल्यापिलांसह हे कामगार काम मिळण्याची प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून आले. शहरातील एका कंत्राटदाराने यांपैैकी सहा-सात काही कामगारांना कामासाठी बोलावले होते. मात्र छत्तीसगडमध्ये हाताला काम मिळत नसल्याने त्या सहा-सात कामगारांसोबत अनेक कुटुंब वणीत दाखल झालेत. छत्तीसगडमध्ये रोजगाराची वाणवा आहे. जूनमध्ये पेरणी झाल्यानंतर मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. या राज्यात ज्वारी, मूग, उडीद , मका आदी पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात येते. पेरणीनंतर दिवाळीपर्यंत या मजुरांच्या हाताला कामच मिळत नाही. अन्य कामे मिळाली तरी मजुरी फार अल्प मिळते. त्यातून कुटुंबाचा गाडा चालविणे कठिण असते. यामुळे छत्तीसडमधून मोठ्या संख्येने कामगार स्थलांतर करीत आहेत. एकट्या वणी उपविभागात दीड हजारांवर कामगार मिळेल ती कामे करीत आहेत. कोणतीही अवजड कामे करण्यास हे मजूर सदैैव तत्पर राहत असल्याने व काम करताना वेळेच्याही अटी हे मजूर घालत नसल्याने छत्तीसगडमधील मजुरांना या भागात मोठी मागणी आहे. या भागातील बांधकामावर मोठ्या संख्येने हे कामगार राबताना दिसतात. कोळसा उद्योगातही हे कामगार कष्ट उपसत आहेत. यासोबतच विदर्भातील अनेक जिल्ह्यात हे कामगार स्थलांतरीत झाले असल्याची माहिती येथे दाखल झालेल्या कामगारांच्या टोळीतील एकाने ‘लोकमत’ला दिली. जुलैै महिन्यात या भागात दाखल झालेले मजूर दिवाळीनंतर पुन्हा आपल्या राज्यात परत जातात. (कार्यालय प्रतिनिधी)आप्तेष्टांच्या भरवशावर मुलांचे शिक्षणछत्तीसगडमध्ये शाळेत प्रवेश घेण्यासाठी किमान सहा वर्षांचे वय आवश्यक आहे. त्यामुळे सहा वर्षाखालील असलेल्या चिल्ल्यापिल्ल्यांना घेऊन हे कामगार कामाच्या शोधात भटकंती करीत असतात. सहा वर्षावरील मुलांना छत्तीसगढ किंवा इतर राज्यात असलेल्या आपल्या आप्तेष्टांच्या भरवशावर शिक्षणासाठी ठेवण्यात येते.
छत्तीसगडमधील दीड हजारांवर कामगार वणीत
By admin | Updated: September 12, 2016 01:22 IST