यवतमाळ : जिल्ह्यातील विविध घाटांवरून तब्बल सात हजार ७५४ ट्रक चोरटी रेती आणून तिचा वापर शासकीय बांधकामावरच करण्यात आला. लाखो रूपयांची रॉयल्टी (महसूल) वाचविण्यासाठी एका कंत्राटदार कंपनीने हा प्रताप केला. ही बाब चौकशीत पुढे येवून रेकॉर्डवरही घेण्यात आली. मात्र अद्यापही खनिकर्म विभागाने चोरीस गेलेल्या रेतीची रॉयल्टी वसूल करण्यासाठी कुठलीही पावले उचलली नाही.बेंबळा प्रकल्पाच्या डेहणी उपसा सिंचन प्रकल्पावरून ८५० किमीची पाईप लाईन प्रस्तावित होती. या पाईपलाइनला बाधा पोहचू नये, म्हणून ३९ कोटी रूपये किमतीची हजारो क्युबिक मीटर रेतीचे वेष्टन टाकायचे होते. ही पाईपलाइन टाकताना कंत्राटदार कंपनीच्या तक्रारी झाल्या. तोवर कंपनीने ८३ हजार ७५१ क्युबिक मीटर म्हणजेच १६ हजार ७५० ट्रक रेतीचे रेकॉर्ड कंत्राटदार कंपनीने उपकार्यकारी अभियंता अनिल सोनेवार यांच्याकडे सादर केले. तसेच रेतीची तीन कोटी रूपयांची देयकेही निकाली काढण्यात आली. दरम्यान प्राप्त तक्रारीवरून बेंबळा प्रकल्प कार्यालयाने याप्रकरणाची चौकशी चालविली. त्यामध्ये रेतीच्या पासेस झरीजामणी, वणी, मारेगाव, पुलगाव येथील रेतीघाटांवरील आणि त्यातही केवळ आठ हजार ९९६ क्युबिक मीटर रेतीच्याच असल्याचे निष्पन्न झाले. वास्तविक बाभूळगाव तालुक्यातील मुबारकपूर आणि कळंब तालुक्यातील शिरपूर हे दोन रेतीघाट प्रकल्पापासून जवळ होते. तेथूनच रेती आणायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. तसेच उर्वरित सात हजार ७५४ ट्रक रेतीच्या पासेस अद्यापही कंत्राटदाराने सादर केल्या नसल्याचे उघड झाले. त्यामुळे ही रेती चोरट्या मार्गाने आणल्याचे रेकॉर्डवर आले. मात्र खनिकर्मने दखल घेतली नाही. परिणामी रॉयल्टीपोटी मिळणारा लाखो रूपये महसूल बुडणार असल्याची विश्वसनिय माहिती आहे. असे असले तरी या रेती घोटाळ्याची पाटबंधारे मंडळाचे बुलडाणाचे अधीक्षक अभियंता डॉ. पी. के. पवार चौकशी करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
घाटांवरून साडेसात हजार ट्रक रेतीची चोरी
By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST