पाटणबोरी : मॉ कालीका सार्वजनिक धर्मदाय संस्थानतर्फे कालीका माता मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला शनिवारपासून सुरूवात झाली. यानिमित्त पैनगंगेच्या नदीतील जल कलशात घेऊन ५५० महिलांनी पायदळ कलशयात्रा काढली.पहाटे ७ वाजताच्या सुमारास सर्व महिला चुनरिया पोशाख धारण करून सजविलेल्या कलाशासह सहा किलोमीटर अंतरावरील तेलंगणा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी पात्रात पोहोचल्या. तेथून कलशात नदीतील पवित्र जल भरले. नंतर कलश यात्रेची मंदिराकडे मिरवणूक निघाली. देवीच्या जयघोषात सजविलेल्या ट्रॅक्टरसह ही कलश यात्रा पायदळ निघाली. डिजेचे भक्ती संगीत, टाळ-मृदुंगाच्या गजरात ती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरून गावात पोहोचली. तत्पूर्वी पिंपळखुटी चेकपोस्टवर यात्रेला थांबवून तेथे केळी, दूध, सफरचंदचे वाटप झाले. सर्व कलशाची पूजाअर्चा करून पवित्र जलाने कालिका मातेच्या मूर्तीचा जलाभिषेक करण्यात आला. या कार्यक्रमाला पोलीस, वन विभाग, चेकपोस्ट, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
साडेपाचशे महिलांची पायदळ कलशयात्रा
By admin | Updated: March 22, 2015 02:11 IST