उमरखेड : घरी कुणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून पाच लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याच घटना तालुक्यातील ढाणकी येथे सोमवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी तीन लाख रोख, दहा तोळे सोने, दोन किलो ३४० ग्रॅम चांदी लंपास केली. ढाणकी येथील व्यापारी विजय दत्तात्रय चिन्नावार एका विवाह समारंभात सहभागी होण्यासाठी सोमवारी गेले होते. त्याच दिवशी ते घरी परत आले असता घराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. घरात सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले. या घटनेची माहिती तत्काळ बिटरगाव पोलिसांना देण्यात आली. चोरट्यांनी चिन्नावार यांच्या घरातून तीन लाख रुपये रोख, दहा तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो ३४० ग्रॅम चांदी असा एकूण पाच लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे पुढे आले. पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. परंतु काहीही निष्पन्न झाले नाही. वर्दळीच्या रस्त्यावरील घरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे. (शहर प्रतिनिधी)
ढाणकी येथे साडेपाच लाखांची धाडसी चोरी
By admin | Updated: May 13, 2015 02:07 IST