चोऱ्यांचे सत्र : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्या पर्वणीज्ञानेश्वर मुंदे यवतमाळ लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे बंद असलेल्या घरांवर चोरट्यांचा डोळा असून शहरात दररोज चोरीच्या घटना घडत आहे. चोरट्यांची हिंमत एवढी वाढली की, भरदिवसाही घर फोडण्यास मागे पुढे पाहत नाही. लाखो रुपयांचा ऐवज चोरटे लुटत असताना पोलिसांना मात्र चोरट्यांचा सुगावा लागत नाही. लहान सहान चोरीची तक्रार करायला नागरिकही पुढे येत नाही. यवतमाळ शहरासारखीच स्थिती संपूर्ण जिल्ह्याची असून चोरी सत्राने नागरिक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. यवतमाळात शहर पोलीस ठाणे आणि वडगाव रोड पोलीस ठाणे असून या दोघांची हद्द सिमेंट रस्त्याने विभागली आहे. दोनही ठाण्याच्या हद्दीत गत महिनाभरांपासून दररोज चोऱ्या होत आहे. जणू चोरट्यांचे संमेलनच यवतमाळात भरल्याचे दिसत आहे. लग्नसराई आणि उन्हाळी सुट्यांमुळे अनेक घरांना कुलूप आहे. यासंधीचा फायदा घेत चोरटे घरफोडी करीत आहे. रात्री चोरटे घरांना निशाणा बनवित आहे. काही भागात तर भरदिवसाही चोऱ्या झाल्याचे उघडकीस आले आहे. यवतमाळच्या अशोकनगरात रंजना भोवते यांच्या घरी भरदिवसा चोरी झाली होती. श्रद्धानगरातील शंकर हजारे यांच्या घरुन चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. नारिंगेनगर तर चोरट्यांच्या खास निशाण्यावर दिसत आहे. महिनाभरात दहा घरफोड्या या परिसरात झाल्या आहे. बाहेरगावी गेलेल्या पवन विनकर यांच्या घरी चोरी झाली. कृषी नगरातील सिद्धार्थ हापसे यांच्या घरी तर लोखंडी आकोड्याने पर्स काढून दागिने लंपास केले. या सर्वांनी शहर आणि वडगाव रोड ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र चोरट्यांचा थांगपत्ता लागत नाही. घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने तेवढे लंपास करतात. घरातील इतर वस्तूंना हातही लावत नाही. यवतमाळ शहराच्या सर्वच सुखवस्तू कॉलनींमध्ये चोरट्यांची दहशत कायम दिसते. गावाला जाताना प्रत्येक जण दहादा विचार करतो.दाराला बाहेरुन लावल्या कड्या यवतमाळ शहरातील बालाजी सोसायटी परिसरात दोन दिवसापूर्वी चोरट्यांनी पाच ते सहा घरांना बाहेरुन कड्या घातल्याचे शुक्रवारी सकाळी लक्षात आले. या परिसरात चोरी करण्याचा चोरट्यांचा इरादा असावा. चोरी करताना घरचा जागा होऊन आरडाओरड केल्यास शेजारी धावून येऊ नये म्हणून पाच ते सहा घरांना बाहेरुन कड्या लावल्या होत्या. या परिसरात सुर्दैवाने गुरुवारी रात्री चोरी झाली नाही. लुटमारीच्या घटनांत वाढ यवतमाळ शहरात काही वर्षापूर्वी मंगळसूत्र चोरट्यांची टोळी सक्रिय होती. या टोळीचा बंदोबस्त झाला असे वाटत असतानाच पुन्हा या टोळीने डोके वर काढल्याचे दिसत आहे. आर्णी बायपास मार्गावर दुचाकीने येणाऱ्या शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेतले. या घटनेची शाई वाळत नाही तोच गोदनी मार्गावरील जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर राजेंद्र फुलझेले यांना लुटण्यात आले होते. खिसेकापूंचा हैदोस सध्या बस स्थानकावर बाहेरगावी जाणाऱ्यांची मोठी गर्दी आहे. या गर्दीचा फायदा खिसे कापू घेत आहे. पुसद, आर्णी, दिग्रस, वणी, यवतमाळ आदी बसस्थानकावर प्रवाशांचे खिसे कापले जात आहे. पुसद येथे दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याचा खिसा कापण्याचा प्रकार उघडकीस आला होता. शेतीसाहित्य निशाण्यावर सिंचनासाठी शेतात लावलेले स्प्रिंकलर पाईप, नोझल व इतर शेती अवजारे चोरट्यांच्या निशाण्यावर आहे. दररोज कुठे ना कुठे शेती साहित्य चोरीस जात आहे. याचा आर्थिक फटका तर शेतकऱ्यांना बसतो मात्र चोरीमुळे सिंचनही खोळंबते. त्यामुळे पिके वाळण्याची भीती आहे. पोलिसांची अशीही तत्परतायवतमाळ शहरातील गोदनी मार्गावर शतपावली करण्यास गेलेल्या व्यक्तीला चौघांनी लुटण्याची घटना घडली. या घटनेत पोलिसांनी तत्परता दाखवून दोघांना अटकही केली. विशेष म्हणजे सदर व्यक्ती एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा भाऊ आहे. त्यामुळे खुद्द वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हा तपास हाती घेऊन चोरट्यांना जेरबंद केले. मात्र एरव्ही चोरीची तक्रार देण्यास ठाण्यात गेलेल्या नागरिकांना कसा अनुभव मिळतो हे कुणालाही सांगावे लागत नाही. मोकळ्या मैदानात शिजतोय कट यवतमाळ शहरात असलेले मोकळे मैदान सध्या चोरट्यांसाठी पर्वणी ठरत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास याच मैदानात मैफिल जमते. या ठिकाणीच चोरीचा कट शिजतो. नेमकी कोठे चोरी करायची, कोणते घर कुलूप बंद आहे, याची तेथेच माहिती एकमेकांंना दिली जाते. विशेष म्हणजे या ठिकाणी प्लॉस्टिकच्या ग्लासात दारू ओतून तेथेच प्राशन केली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी या मैदानावर दारूचे रिकामे प्लॉस्टिक ग्लास आणि वेफर्सची पॉकीटे पडलेली दिसून येतात. कोणत्याही मैदानाचे बारकाईने निरीक्षण केल्यास हा प्रकार सहज दिसतो.
बंद घरांवर चोरट्यांचा डोळा
By admin | Updated: May 4, 2015 00:11 IST