वणी : येथील पंचायत समितीमधील काही शिक्षकांविरुद्ध विविध कारणांवरून शिक्षण विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या़ त्या शिक्षकांवर कारवाई करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीने जिल्हा परिषदेकडे पाठविले. मात्र त्या प्रस्तावांवर जिल्हा परिषदेने अद्याप कारवाई केली नाही़ त्यामुळे आता हे प्रस्ताव निकाली काढावे, यासाठी सभापती व जिल्हा परिषद सदस्यांनी दंड थोपटले असून कारवाई न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.येथील पंचायत समिती अंतर्गत कायर येथील प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेमिला शेंद्रे, गणेशपूर शाळेच्या उच्चश्रेणी शिक्षिका नंदा मंथनवार, निंबाळा रोड शाळेचे शिक्षक दीपक दोडके, यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीतर्फे जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले आहे. मात्र कित्येक महिने लोटूनही या प्रस्तावांची दखल जिल्हा परिषदेने घेतलीच नाही़ येथील शिक्षण विभाग नेहमीच विविध कारणांनी चर्चेत असतो. शिक्षकांच्या बदल्या, समायोजन आदी प्रक्रियेत सातत्याने वाद होतात. पूर्णवेळ गटणिक्षणाधिकारी नसल्याने प्रभारावर गाडा हाकलला जातो. गेली कित्येक वर्षे येथे पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारीच नाही. विस्तर अधिकाऱ्ऱ्याला प्रभार देऊन शिक्षण विभागाचा कार्यभार बघितला जात आहे. त्यामुळे कुणाचाच वचक कुणावर नाही. लोकप्रतिनिधींनीही कुणी जुमानायला तयार नाहीत. जिल्हा परिषदही त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांमध्येही तीव्र संताप व्यक्त होत आहे.येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारी नुकतेच निलंबित झाले. आता त्यांचा प्रभार मारेगाव येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. ते सप्ताहातून मोजकेच दिवस येतात. त्यामुळे शिक्षण विभाग पुन्हा पोरका झाला आहे. एखाद्या तक्रारीवरून गटशिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन केले जात असताना, पंचायत समितीने कारवाईचे प्रस्ताव पाठवूनही शिक्षकांवर कारवाई का केली जात, नाही असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती प्रशासनाला जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
लोकप्रतिनिधींवरच आली आता आंदोलनाची वेळ
By admin | Updated: August 14, 2014 23:56 IST