पाटणबोरी : पांढरकवडा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या पाटणबोरी येथे महावितरणच्या भोंगळ कारभाराने कळस गाठला आहे. परिसरातील नागरिकांमध्ये महावितरणप्रती तीव्र असंतोष खदखदत आहे़येथे भारनियमन हे दैनंदिन झाले आहे. सोबतच कधी वीज गुल होईल, याचा काहीच नेम नाही़ येथे वीज कधीही जाते आणि कधीही परत येते. वीज नसताना विचारणा केली असता, येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे नेहमी नवीन उत्तरे असतात़ कधी वरूनच वीज बंद आहे, कधी ट्रान्सफार्मर जळाले, कधी मेंटेनन्सचे कारण सांगितले जाते. कधी बिघाड झाला आहे, फॉल्ट सापडत नसल्याचे सांगितले जाते़ यावरून कंपनी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कामचुकारपणा व अनुभवाची कमी असल्याचे दिसून येत आहे़ यापूर्वीचे कर्मचारी प्रामाणिक व नोकरीप्रती गंभीर होते़ मात्र सध्या कर्मचारी निर्ढावले आहे़ त्यांना कामाबद्दल व नागरिकांच्या समस्यांबद्दल काहीही देणे-घेणे नाही़ कोणतीही समस्या घेऊन गेलेल्या वीज ग्राहकाला उडवाउडवीची उत्तरे देऊन परत पाठविले जाते़ वीज देयकात दुरूस्तीकरिता ग्राहकांना पांढरकवड्याचा रस्ता दाखविला जातो़ वीज पुरवठा अखंड पुरविण्यास गंभीर नसलेले महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा तोडण्यात मात्र चांगलेच वस्ताद आहे़ कार्यालयात न दिसणारी ही मंडळी वीज कापण्याचे साहित्य सोबत घेऊन गावात हिंडताना नेहमी दृष्टीपथास पडते.येथील दुय्यम दर्जाच्या उपअभियंत्यांकरिता स्वतंत्र निवासस्थानाची व्यवस्था आहे. मात्र सदर अभियंता पांढरकवडा येथून ये-जा करतात़ यावरून नोकरीप्रती त्यांची गंभीरता लक्षात येते़ ते सतत ये-जा करीत असल्याने कर्मचाऱ्यांवर वचक नाही. परिणामी कर्मचारीच अधिकारी बनले आहे़ लगतच्या मांडवी येथील कृषी पंपाचे ट्रान्सफार्मर जळाले़ या ट्रान्सफार्मरवर थकीत देयक नसतानाही ते एक हप्त्यानंतरही बदलविण्यात आले नाही़ या ट्रान्सफार्मरवरील शेतकरी आनंद चोपडा, श्रीनिवास अडपावार, वासुदेव जन्नावार, हिवराज मेश्राम, मधू बनपेल्लीवार आदींनी उपअभियंत्यांची भेट घेऊन व्यथा मांडल्या़ त्वरित ट्रान्सफार्मर न लावल्यास सामूहिक फाशी घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही दिला. उपअभियंत्याने ट्रान्सफार्मरची मागणी मुख्य कार्यालयाला कळविल्याचे सांगून ते आल्यानंतर बसवू, एवढेच उत्तर देऊन पळवाट शोधली. (वार्ताहर)
भारनियमनाची समस्या झाली गंभीर
By admin | Updated: November 12, 2014 22:52 IST