जिल्हा परिषद : पुसद तालुक्यात गावागावांत भेटीगाठीवर भर पुसद : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केला नाही. परंतु अनेक इच्छुक गावागावांत भेटीगाठी घेऊन प्रचार करताना दिसत आहेत. उमेदवारीचा पत्ता नाही आणि प्रचार मात्र सुरू, अशी अवस्था पुसद तालुक्यात दिसत आहे. पुसद तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी चालविली आहे. आपल्यालाच उमेदवारी पक्की, असे समजून अनेकजण ग्रामीण भागात पहाटेपासून प्रचारात गुंतले आहे. आपण कसे सक्षम आहो, भाऊ-दादांनी आपल्यालाच तिकिटासाठी शब्द दिला आहे, असे सांगत ही मंडळी ग्रामीण मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येकांची आपुलकीने विचारपूस करीत आहे. लग्न, साखरपुडा आणि दु:खात सहभागी होत आहेत. एखाद्या गावात निधन झाले की त्याच्या अंत्ययात्रेला नातेवाईकांसोबतच या इच्छुकांची गर्दी दिसून येते. संबंधितांच्या सांत्वनासोबतच मतांचा अप्रत्यक्ष जोगवाही मागितला जातो. काहींनी मकरसंक्रांतीचा मुहूर्त साधून आपल्या सौभाग्यवतींच्या माध्यमातून गावागावात वाण वाटण्याचे कार्यक्रम आयोजित केले आहे. गावातील समस्यांकडे कधीही लक्ष न देणारे आता मात्र गावासोबतच परिसरातील समस्यांवर तावातावाने बोलताना दिसत आहे. इच्छुक कामाला लागले असताना दुसरीकडे पक्षापक्षातही कुणाला तिकीट द्यावे, यावर मंथन सुरू आहे. बहुतांश पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहे. आता त्यांची चाचपणी केली जात आहे. नामांकनाला बराच अवधी असल्याने कोणताही पक्ष आपले पत्ते खोलायला तयार नाही. प्रत्येक पक्षात इच्छुकांची झालेली गर्दी आणि होणारी बंडखोरी टाळण्यासाठी प्रत्येकच पक्ष वेळेवर उमेदवार जाहीर करण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)
उमेदवारीचा पत्ताच नाही, इच्छुक मात्र प्रचारात व्यस्त
By admin | Updated: January 18, 2017 00:18 IST