रावसाहेब दानवे : पुसद येथे भाजपा कार्यकर्ता मेळावापुसद : वर्षानुवर्षे सत्ताही कुणाचीही मक्तेदारी नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपाची एकहाती सत्ता असून, पुसद तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात द्यावी, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केले. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यादवराव देशमुख परिसर भोजला-वनर्वाला येथे आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने, वसंतराव पाटील कान्हेकर, भाजपाचे नेते अॅड़ निलय नाईक, माजी आमदार उत्तमराव इंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, संजय देशमुख, डॉ. शेषराव सूर्यवंशी, विनोद जिल्हेवार, महेश नाईक, अॅड़ माधवराव माने उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, पुसदकरांनी घड्याळाची चावी लावण्यापेक्षा कमळाचे फुल लावावे. देशात राजकीय परिवर्तनाचे वारे असून, नोटबंदीपूर्वी महाराष्ट्रात भाजपाचे केवळ आठ नगराध्यक्ष होते. आता ७२ नगराध्यक्ष झाले आहेत. तर पूर्वी २४० नगरसेवक होते आता १२०० नगरसेवक झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकार शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेत असून, दोन वर्षात २७ हजार कोटी रुपये शेतीवर खर्च केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी गावागावात जाऊन लोकांना आपण करत असलेल्या कार्याची माहिती दिली तरच पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयावर लोकांचा विश्वास बसेल, असे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात काँग्रेस, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षातील अनेकांनी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. प्रास्ताविक अॅड़ निलय नाईक यांनी केले. या मेळाव्याला भाजपाचे सर्व नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वीतेसाठी धनंजय अत्रे, विश्वास भवरे, भारत पाटील, रवी ग्यानचंदानी, निरज पवार, निळकंठ पाटील, अश्विन जयस्वाल, निखील चिद्दरवार, सूरज डुबेवार, पंकज जयस्वाल, परमेश्वर जयस्वाल, ओम शिंदे यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
सत्ता कुणाचीही मक्तेदारी नाही
By admin | Updated: January 20, 2017 03:01 IST