बाभूळगाव : चोरीला गेलेल्या ट्रकचा पंचनामा करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी बाभूळगावचे ठाणेदार देवसिंग बावीस्कर यांना शुक्रवारी अटक करण्यात आली. फौजदार सचिन शेलोकर यांनाही आरोपी बनविण्यात आले आहे. सायंकाळी बाविस्कर यांना जामीन मंजूर करण्यात आला.बाभूळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोहंमद जावेद रा. अमरावती या व्यावसायिकाचा ट्रक चोरीस गेला होता. या ट्रकचा पंचनामा करून त्याची प्रत देण्यासाठी २० हजाराची मागणी केली गेल्याचा आरोप आहे. लाच मागणीचे संभाषण मोहंमद जावेद यांनी रेकार्ड करून ५ नोव्हेंबरला एसीबीकडे तक्रार नोंदविली. उपअधीक्षक सतीश देशमुख यांनी या मागणीची खातरजमा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी दोनदा हा सापळा अयशस्वी ठरला होता, हे विशेष! ठाणेदाराला शासकीय निवासस्थानातून अटक झाली. फौजदार शेलोकर हे न्यायालयीन कामकाजानिमित्त नागपूर येथे गेले असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही. ठाणेदार आणि फौजदारावर एकाचवेळी एसीबीचा गुन्हा नोंद होण्याची बहुदा ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी. यवतमाळ येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ठाणेदार बावीस्कर यांना काही दिवसापूर्वी मोबाईलवरून सापळ््याची टीप दिली होती. त्यामुळे ठाणेदार बाविस्कर काही दिवस रजेवर गेले. या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची मोबाईल कॉलडीटेल्सव्दारे चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. (प्रतिनिधी)
लाच मागणाऱ्या ठाणेदाराला अटक
By admin | Updated: December 13, 2014 02:24 IST