खंडाळाची घटना : ट्रकच्या थकबाकीचे पैसे पुसद : साखर कारखान्याने थकबाकीसाठी ताब्यात घेतलेला ट्रक परत मिळावा म्हणून ट्रक मालकाने चक्क खंडाळा पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली असून ट्रक मालकावर पुसदच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.उत्तम रामधन जाधव (३५) रा. मांजरजवळा असे विष प्राशन करणाऱ्याचे नाव आहे. त्याने सांगली जिल्ह्यातील पलूस येथील साखर कारखान्याला ट्रक भाड्याने दिला होता. त्यासाठी दोन लाख रुपये अग्रीम उचलले होते. मात्र वाद झाल्याने कारखान्याने ट्रक आपल्या ताब्यात ठेवला. दोन लाख रुपये द्या आणि ट्रक घेऊन जा अशी कारखाना प्रशासनाची भूमिका होती. दरम्यान सदर कारखान्याचे कर्मचारी मांजरजवळा येथे आले. त्यांनाही उत्तमने वेठीस धरले. त्यावरून कर्मचाऱ्यांनी खंडाळा पोलीस ठाणे गाठून उत्तमविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याच वेळी या प्रकरणात उत्तमने पोलिसांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने सोबत आणलेले विष ठाण्यातच प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच ठाणेदार भगवान जाधव यांनी पुसदच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. या घटनेने खळबळ उडाली. (प्रतिनिधी)
ठाण्यात ट्रक मालकाचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: August 29, 2015 02:35 IST