यवतमाळ : नव्या एसपींची पहिली क्राईम मिटींग शनिवारी १३ जून रोजी होत आहे. या मिटींगमधून पोलीस प्रशासनाचे धोरण दिसणार असल्याने याकडे सर्व ठाणेदारांच्या नजरा लागल्या आहेत. अखिलेशकुमार सिंह यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर शनिवारी त्यांची पहिली क्राईम मिटींग होणार आहे. या मिटींगची पोलीस दलात अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. साहेब अवैध धंद्यांबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हा दंडाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्वत: पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. हीच भूमिका एसपींचीही राहण्याची शक्यता आहे. मात्र मनाई आदेशानंतरही अवैध धंद्यावर धाड घातली गेल्यास संबंधित ठाणेदारावर नेमकी काय कारवाई होणार हे महत्वाचे आहे. म्हणूनच क्राईम मिटींंगवर ठाणेदारांचे पुढचे गणित अवलंबून आहे. (प्रतिनिधी) ढाब्यांना मागितली दहा प्रश्नांची उत्तरेजिल्ह्यातील सर्व ढाबे मालकांना महसूल प्रशासनाने नोटीस बजावली आहे. त्यात दहा प्रश्नांची उत्तरे त्यांना मागितली गेली आहे. ढाबा असलेल्या जागेचा अकृषक परवाना आहे का, वीज मीटर कोणत्या वापरासाठी (घरगुती-वाणिज्यीक) घेतले, सिलिंडर कोणत्या प्रकारचे वापरले जाते, खाद्य परवाना आहे का, तेथे मद्य विकले जाते का आदी प्रश्नांचा त्यात समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे थांबविण्याचे निर्देश दिले होते. ढाबा मालकांना बजावण्यात आलेली नोटीस हा या कारवाईचाच एक भाग आहे. पोलिसांच्या स्तरावरूनही नोटीसा बजावल्या जात आहे.
ठाणेदारांच्या नजरा क्राईम मिटींगवर
By admin | Updated: June 13, 2015 02:32 IST