वाटमारीचा गुन्हा : हप्ता वसुलीत ‘तडी’ जेरबंदयवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील व्यावसायिकांकडून हप्ता वसुली करणारा तडी उर्फ अमित धनंजय देशमुख याला शहर पोलिसांनी वाटमारीच्या गुन्ह्यात अटक केली. त्यानंतर आरोपीने शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत सळाखींवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता घडली. शासकीय रुग्णालय परिसरात काही दिवसांपूर्वी तडी हा सायकल स्टँड चालविण्याचा व्यवसाय करत होता. त्याचा गुन्हेगारी क्षेत्रात नेहमीच सक्रिय सहभाग राहिला. त्यामुळे त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. याच परिसरात चहा बिस्कीट विक्रीचा व्यवसाय करणार ज्ञानेश्वर चव्हाण याला धकमाकवून त्याच्या खिशातील ५०० रूपये हिसकावल्याचीे तक्रार चव्हाण याने शहर ठाण्यात दिली. यावरून शहर पोलिसांनी आरोपी तडी याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात वाटमारीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अटक का केली म्हणून आरोपी तडीने बुधवारी रात्री पोलीस कोठडीच्या दारावर डोके आपटायला सुरूवात केली. हा प्रकार कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या निदर्शनास येताच त्याला बाहेर काढण्यात आले. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुन्हा कोठडीत डांबले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तडी विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल केला. (कार्यालय प्रतिनिधी)
ठाण्यात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Updated: September 25, 2015 03:05 IST