वणी : नव्या वर्षाच्या आगमनासोबतच शाळांच्या स्रेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह अधिक संचारला. बहुतांश शाळांची स्रेहसंमेलने जानेवारीत पार पडली. सर्वच शाळेत विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, विविध स्पर्धा यांची रेलचेल झाली. मात्र फेब्रुवारी महिन्यात प्रवेश करताच शाळांमध्ये परीक्षांचे वारे वाहू लागले आहे.नुकत्याच शाळाअंतर्गत घटक चाचणी, सराव परीक्षा पार पडल्या. आता येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीची, तर नंतर ३ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. त्यासाठी परीक्षा केंद्राची निवड करण्यात आली आहे. परीक्षेचे साहित्य बोर्डाकडून परीक्षा केंद्रावर पोहोचविण्यात आले आहे. बारावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या जीवनाला वळण देणारी परीक्षा असते. बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षीक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारी दरम्यान शाळांमध्ये घेतल्या जात आहे. नियमित व खासगी विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षा देणे अनिवार्य करण्यात आले आहे. तोंडी परीक्षांचे गुण सहशालेय विषयाचे ग्रेड यांच्या गुणपत्रिका शाळांनी २० फेब्रुवारीला शिक्षण मंडळाकडे सादर करावयाच्या आहे. पेपर तपासणीसाठी परीक्षक व समीक्षक यांच्या नियुक्त्याही शिक्षण मंडळाकडून करण्यात आल्या आहे. ही कामे करणे अनिवार्य करण्यात आली आहे. परीक्षक किंवा समीक्षक यांची नियुक्ती केवळ जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रमाणपत्र व १० दिवसांपेक्षा अधिक रजा मंजुरीचे आदेश सादर केल्यानंतरच रद्द होऊ शकते, अशा कडक सूचना शिक्षण मंडळांनी शाळांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून गैरमार्गाशी लढा विषयांतर्गत परीक्षेत कॉपी करणार नसल्याबाबतची शपथ घेण्याचे कळविण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांना बाहेरून नागरिकांचा उपद्रव होणार नाही, यासाठी केंद्र स्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. परीक्षाविषयक अधिक माहिती देण्यासाठी बारावीच्या केंद्र संचालकांची सभा १४ फेब्रुवारीला यवतमाळ येथील नंदूरकर विद्यालयात बोर्डाने आयोजित केली आहे. बारावी आणि दहावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांचया जीवनातील महत्वाचा घटक असते. त्यामुळे या परीक्षेला विद्यार्थ्यांसह पालकही काळजीने सामोरे जातात. आता शाळा, महाविद्यालयात बारावीसाठी तोंडी परीक्षांना सुरूवात झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांची जीव टांगणीला लागला आहे. यानंतर प्रात्याक्षिक परीक्षा झाल्यावर लेखी परीक्षांना सुरूवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालक अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
परीक्षेचे वारे वाहू लागले
By admin | Updated: February 5, 2015 23:17 IST