यवतमाळ : गोपनीय माहिती आणि तक्रारदार समोर येण्यास तयार नसला की, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग खातरजमा करून रनिंग ट्रॅप (स्वयंप्रेरणेने) करून लाच घेणाऱ्याला जाळ््यात अडकवयाचे. मात्र गेल्या पाच वर्षात यवतमाळात अशी एकाही कारवाई झाली नाही. परिणामी भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांत रनिंग ट्रॅपचा धाकच संपल्याचे चित्र आहे. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्ह्यात ३५ जणांवर कारवाई केली. लाच स्विकारणाऱ्याला सापळ््याची कुणकुण लागली की तो लाच स्विकारत नाही. तेव्हा शासकीय पंचासमक्ष खातरजमा करून गुन्हा नोंदविला जातो. मात्र पाच वर्षात येथील कार्यालयाने रनिंग ट्रॅप व्दारे एकही प्रभावी कारवाई केली नाही. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रनिंग ट्रॅपमध्ये तक्रारकर्ता रहात नसल्याने कारवाई केल्यानंतर पथकातील अधिकाऱ्याला फिर्यादी व्हावे लागते. न्यायालयात खटला दाखल झाला की, लाच स्विकारताना सापडलेला लोकसेवक अथवा त्याचा वकील आपल्यावर लाचलुचपत विभागाने आकसातून कारवाई केल्याचा युक्तीवाद करतात. काही वेळा साक्षीदारही फितूर झाले. त्यामुळे अखेर नाईलाजास्तव त्या कारवाईत बी फायनल (तक्रारीत तथ्य नाही) न्यायालयात सादर करावे लागले. प्रसंगी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रोषही ओढवला जातो. त्यामुळे येथे रनिंग ट्रॅप होत नसल्याचे सांगण्यात आले. राजरोसपणे अधिकारी आणि कर्मचारी लाचेची मागणी करतात. परंतु तक्रारदार समोर येण्यास घाबरतो. त्यावेळी ही कारवाई प्रभावी ठरते. मात्र आता त्याचा धाकच उरला नसल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)
एसीबीच्या रनिंग ट्रॅपची दहशत संपली
By admin | Updated: August 10, 2014 23:12 IST