भिसीच्या माध्यमातून फसवणूक : काल्पनिक सदस्यांच्या नावावर उचलले पैसे आर्णी : काल्पनिक सदस्याच्या नावावर भिसी सुरू करून एका निवृत्त शिक्षकाने आपल्या दोन मुलांच्या मदतीने पाच जणांना सात लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार आर्णी येथे उघडकीस आला. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. निवृत्त शिक्षक समशेर खान इब्राहिम खान पठाण, मुलगा आबित खान समशेर खान पठाण आणि रिजवान खान समशेर खान पठाण अशी आरोपींची नावे आहे. या तिघा बापलेकांनी आर्णी शहरातील व्यापाऱ्यांंना हेरुन भिसीची कल्पना सांगितली. त्यानुसार शहरातील तसकील वकील शेख रा. मुबारकनगर, इरफान युनुस नागाणी, जैरुद्दीन ग्यासोद्दीन बैलीम, मुनीर हाफीज शेख, शांताबाई रामलिंग सूर्यवंशी, उमेश दयाराम पवार यात सहभागी झाले. दरमहा १० हजार आणि २५ हजार या प्रमाणे दोन बीसी सुरू केल्या. दर महिन्याच्या १ तारखेला उत्तम टॉकीज परिसरातील त्यांच्या मालकीच्या सहारा जनरल स्टोअर्समध्ये लिलाव पद्धतीने भिसी काढली जात होती. यात एकूण १२ सदस्य असल्याचे सांगितले जात होते. परंतु पहिल्या पाच भिसी लागलेले मंडळी समोरच आले नाही. केवळ त्यांच्याशी फोनवर बोलूनच बीसीचा लिलाव होत होता. दरम्यान २० आॅक्टोबर २०१४ पासून पाच महिने याच पद्धतीने भिसी चालविली. प्रत्यक्ष सहभागी असलेल्या सदस्यांच्या भिसीची वेळ आली तेव्हा भिसीचे पैसे देण्यास या तिघांनीही टाळाटाळ केली. उर्वरित पाच जण पैसे द्यायला तयार नाही, असे सांगितले जात होते. त्यांची नावे आणि पत्ते विचारले असता तेही देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यानंतर या पाच जणांच्या नावांचा शोध घेतला. परंतु हे पाचही जण काल्पनिक असल्याचे लक्षात आले.तसकील वकील शेख याने आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पाच जणांचे प्रत्येकी १ लाख ३० हजार या प्रमाणे समशेरने ७ लाख ८० हजार रुपयाने फसवणूक केल्याची तक्रारीत म्हटले आहे. यावरून आर्णी पोलिसांनी तिघा बापलेकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)पैसे मागणाऱ्यांना आत्महत्येची धमकी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच भिसी टाकणाऱ्यांनी समशेर खान याच्याकडे पैसे मागण्याचा प्रयत्न केला. मात्र पैसे मागाल तर मी आत्महत्या करून तुमच्या नावाने चिठ्ठी लिहील अशी धमकी देत होता, असेही या तक्रारी नमूद आहे.
निवृत्त शिक्षकाने घातला लाखोंचा गंंडा
By admin | Updated: May 4, 2015 00:14 IST