संघटना आक्रमक : १ तारखेला वेतन देण्याच्या शासन निर्णयाला केराची टोपली यवतमाळ : एकीकडे शिक्षकांना महिन्याच्या १ तारखेलाच पगार देण्याचा आदेश आलेला असताना शिक्षकांचे पगार तब्बल दोन-दोन महिने अडकविले जात आहे. जिल्ह्यातील शिक्षकांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. या संदर्भात जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशनने शिक्षकांच्या वेतनातील विलंबाबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. सीईओ डॉ.कलशेट्टी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील शिक्षकांना फेब्रुवारी आणि मार्च २०१६ या दोन महिन्यांचे मासिक वेतन अद्यापही देण्यात आलेले नाही. एप्रिल महिन्यात ८ एप्रिलला गुढीपाडवा, १४ एप्रिलला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती तर १५ एप्रिलला श्रीराम नवमी आहे. या सण-उत्सवाच्या काळात शिक्षकांच्या हाती पैसा नाही. शिवाय लग्नसराईचा हंगाम आहे. तसेच अनेक शिक्षकांनी कर्ज काढून घर बांधणी केलेली आहे. पगार न झाल्यामुळे या कर्जाचे हप्ते थकत आहे. त्यामुळे शिक्षकांवर आर्थिक भुर्दंडही पडत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती साजरी करीत असतानाच कर्मचाऱ्यांवर मात्र वेतन अडकवून अन्याय केला जात आहे. या बाबत निवेदनात रोष व्यक्त करण्यात आला आहे. राज्य शासनाने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याच्या १ तारखेलाच त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या बाबतचा शासन आदेश आॅगस्ट २०१५ मध्ये निर्गमित झाला. मात्र जिल्ह्यात आजपर्यंत एकाही महिन्यात वेळेवर वेतन अदा करण्यात आलेले नाही. वेतनाला विलंब झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी करून कारवाईची तरतूद शासन आदेशात आहे. मात्र या आदेशालाच शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविल्याचे दिसून येत आहे. दोन-दोन महिने वेतन न होणे ही गंभीर बाब असून फेब्रुवारी व मार्च महिन्याचे पगार ७ एप्रिलच्या आत देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनावर इंडियन बहुजन टिचर्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दिवाकर राऊत, सरचिटणीस नंदकिशोर वानखडे यांची स्वाक्षरी आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
दोन महिन्यांपासून शिक्षकांचे पगार थकले
By admin | Updated: April 6, 2016 02:42 IST