यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतनातून प्रत्येक महिन्याला २०० रुपये मासिक वर्गणी गोळा केली जाते. यातून कल्याण निधी जमा करण्यात आला आहे. तब्बल १० कोटी ७७ लाख ५७ हजार २३४ रुपयांची ही रक्कम खासगी पतसंस्थांमध्ये गुंतविली आहे. या समितीचा अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष असल्याने चुकीचा पायंडा पाडण्यात आला आहे. पतसंस्थांमध्ये असलेला कल्याण निधी कितपत सुरक्षित आहे, यावर शिक्षक संघटनांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पतसंस्थेतील ठेवी बुडण्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. यवतमाळातच नव्हे तर राज्यपातळीवर मोठमोठ्या पतसंस्था बुडाल्या असून, संचालक मंडळांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल होत आहे. अशा स्थितीत शिक्षक कल्याण निधीचे पैसे खासगी पतसंस्थांमध्ये ठेवणे धोकादायक असल्याची तक्रार शिक्षक संघटनांच्या नेत्यांनी केली आहे. मुळात शिक्षक कल्याण निधीची रक्कम ही जिल्हा मध्यवर्ती बँक अथवा राष्ट्रीयकृत बँकेत गुंतविणे आवश्यक आहे. मात्र या नियमाला बगल देऊन तीन कर्मचारी पतसंस्थांमध्ये ही रक्कम गुंतविण्यात आली आहे. पतसंस्थांचे हित जोपासण्यासाठी कर्मचारी कल्याण समितीच्या अध्यक्षाकरवी ही तडजोड करण्यात आल्याचा आरोप होत आहे. कर्मचारी संघटनांनी सातत्याने मागणी करूनही कर्मचारी कल्याण निधीची रक्कम राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष केले जात आहे. कर्मचारी कल्याण समितीचे अध्यक्ष स्वत: जिल्हा परिषद अध्यक्ष आहे. सचिव प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि उपाध्यक्ष शिक्षण सभापती असून, काही पतसंस्थांच्या संचालकांनी आपले हितसंबंध प्रस्थापित करून शिक्षक कल्याण निधीची कोट्यवधीची रक्कम स्वत:च्या पतसंस्थेत ठेऊन घेतली आहे. यामध्ये आर्णी, पुसद आणि यवतमाळ येथील तीन पतसंस्था समाविष्ट आहेत. इतकी मोठी रक्कम ठेवी स्वरुपात दिली असताना पतसंस्थांकडून कुठल्याही स्वरुपात करार अथवा हमीपत्र घेण्यात आलेले नाही. पतसंस्थातील फसवणुकीची प्रकरणे पाहता शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष पुरूषोत्तम ठोकळ, राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष सुभाष धवसे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गजानन मडावी, शिक्षक समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, जिल्हा परिषद अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजीव मोरे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष अनिल उत्तरवार, केंद्रप्रमुख शिक्षक संघटनेचे अध्यक्ष चंद्रमणी वानखेडे, विस्तार अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्रीधर कन्नाके, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर जीवणे आदींनी जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे यांच्याकडे निवेदन दिले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
शिक्षक कल्याण निधी खासगी पतसंस्थेत
By admin | Updated: May 18, 2015 02:12 IST