वणी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना वाचनासाठी १० मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका देण्याचा निर्णय येत्या परीक्षेपासून मंडळाने घेतला आहे. सोबतच कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा घेण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांसोबतच आता दक्षता समितीवर सोपविण्यात आली आहे.दहावी, बारावी परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडविण्याकरिता विषयनिहाय १ ते ३ तास वेळ निर्धारित करण्यात आला आहे. मात्र त्यापैकी काही वेळ प्रश्नपत्रिका वाचनात जात असल्याने उत्तरे लिहिण्यास वेळ अपुरा पडत असल्याची विद्यार्थ्यांची ओरड होती. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्याची घोषणाही केली होती. त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाने येत्या फेब्रुवारी व मार्चमध्ये होणाऱ्या बारावी व दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचनासाठी निर्धारित वेळेव्यतिरिक्त १० मिनिटे अधिक वेळ देण्याची सूचना सर्व केंद्र संचालकांना एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. या परिपत्रकानुसार ११ वाजता सुरू होणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना १०.५० वाजता, तर ३ वाजता सुरू होणाऱ्या पेपरची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना २.५० वाजता देण्यात येणार आहे. मात्र प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिणे सुरू करता येणार नाही. केवळ प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी हा वेळ देण्यात येणार आहे. आता ११ वाजता सुरू होणाऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांना १०.३० ते १०.४० परीक्षा खोलीत प्रवेश देणे, १०.४० वाजता उत्तरपत्रिका, बारकोड स्टीकर यांचे वितरण करणे, उत्तरपत्रिका मिळताच विद्यार्थ्यांनी पान क्रमांक दोनवरील सूचना काळजीपूर्वक वाचण्याची सूचना खोली पर्यवेक्षक देतील. त्यानंतर १०.५० ला प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाईल व ११ वाजता उत्तरे लिहिण्यास सुरूवात करता येईल. अध्ययन अक्षमता असणारे, अपंग व सिकलसेल विद्यार्थ्यांना जादा वेळ देण्यात येणार आहे.परीक्षा केंद्राबाहेरील गोंधळावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक केंद्र स्तरावर दक्षता समितीचे गठण करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या समितीमध्ये सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे पदाधिकारी व ज्यांचे पाल्य परीक्षेला बसले नाहीत, अशा पालकांचा समितीत समावेश राहणार आहे. परीक्षेपूर्वी दक्षता समितीची सभा घेऊन त्यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्यांची जाणीव मुख्याध्यापकांनी करून देण्याच्या सूचना आहे. दक्षता समिती सदस्य केवळ केंद्राच्या बाहेरील गैरप्रकारावर लक्ष ठेवतील. परीक्षा संचालनात त्यांना कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. ‘गैरमार्गाशी लढा’ हा उपक्रम राबविण्यासाठी मुख्याध्यापक व केंद्र संचालकांना विविध निर्देशही देण्यात आले आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
शिक्षक, दक्षता समितीवर आता कॉपीमुक्ती जबाबदारी
By admin | Updated: February 18, 2015 02:11 IST