दोन महिला गंभीर : पुसद येथील माहूर चौफुलीवरील घटना पुसद : भरधाव तवेरा कार एसटी बसवर आदळून झालेल्या अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या. ही घटना येथील माहूर चौफुलीवर गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. पुसद आगाराची बस (क्र.एम.एच-०७-सी-९५०८) ही पुसदवरून फुलसावंगीकडे जात होती. येथील फुलसिंग नाईक विद्यालयासमोरील माहूर चौफुलीवर एसटी वळत असताना दिग्रसवरून पुसदकडे जाणारी तवेरा कार (क्र.एम.एच-२७-एसी-६६००) बसवर जाऊन आदळली. अपघात एवढा भीषण होता की, तवेरा कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. जखमींना तत्काळ पुसदच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी बस चालक इनायत खान रा. गांधी वार्ड यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. (प्रतिनिधी)
तवेरा एसटी बसवर आदळली
By admin | Updated: June 5, 2015 00:15 IST