सचिंद्र प्रताप सिंह : आत्मा नियामक मंडळाच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या सूचनायवतमाळ : पीक प्रात्यक्षिके घेताना पारंपरिक पिकांऐवजी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार नवनवीन पिकांची प्रात्यक्षिके घ्या. या पिकांमध्ये मिरची, हळद, तीळ, उडीद, मूग, टरबूज यासारख्या पिकांचा समावेश असावा, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले. गार्डन हॉल येथे आत्माच्या नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके यांच्यासह तालुका कृषी अधिकारी, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पारंपरिक पिकांसोबतच शेतकऱ्यांनी फळे व मसाला पिकेही घेणे आवश्यक आहे. यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत केल्या. पीक प्रात्यक्षिक घेताना मिरची, हळद, तीळ, सोप, ओवा, उडीद, मूग, शेवगा, टरबूज आदी वननवीन पिकांची प्रात्यक्षिके घेतली जावी. यातून शेतकरी या नवीन पिकांकडे आकर्षित होतील. यासाठी कृषी विभागाने विशेष लक्ष दणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आत्मा योजनेंतर्गत प्रगतिशील, अनुभवी, नावीन्यपूर्ण शेतकऱ्यांच्या शेतावर प्रक्षेत्र उपक्रम राबविण्यासोबतच तालुकास्तरावर आत्मा समितीची बैठक दरमहिन्याला घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कृषी क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दाखविण्यासाठी शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करावे. फळ पिकांना अलीकडे फार महत्व आले आहे. शेतकऱ्यांना या पिकांचे चांगले प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळझाड योजनेची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांना करुन देण्यात यावी. यासोबतच दुग्ध व्यवसायाकडे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी दुग्ध व्यवसाय विभागाने शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. या पावसात विहीर पुनर्भरणाचा कार्यक्रम राबविल्यास तो यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाकडे जातीने लक्ष द्यावे, असे सांगून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत रायपनिंग चेंबर तसेच हळद प्रक्रिया केंद्र उभारण्याची सूचना त्यांनी केली. आत्माचे प्रकल्प संचालक अनिल इंगळे यांनी यावेळी प्रकल्पाची माहिती दिली. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पीक प्रात्यक्षिके घ्या
By admin | Updated: September 26, 2015 02:32 IST