ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई : शेकडो महिला धडकल्या पुसद पंचायत समितीवरपुसद : तालुक्यातील सावरगाव गोरे येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, प्रशासनाचे या पाणीटंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी गावातील महिलांनी येथील पंचायत समितीवर घागर मोर्चा काढला. संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चाने पंचायत समिती परिसर दणाणून गेला होता. पुसद तालुक्यातील माळपठारावरील सावरगाव गोरे गावातील विहिरीचे पाणी अशुद्ध असून, या विहिरीची पडझड झाली आहे. गावातील नाल्याचे सांडपाणी या विहिरीत जाते. ही बाब आरोग्याच्यादृष्टीने घात आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. हा प्रश्न कायमचा मिटवावा या मागणीसाठी गावातील महिला गुरूवारी येथील पंचायत समिती कार्यालयावर धडकल्या. यावेळी महिलांनी हातात फलक धरले होते. सभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यावेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्वरित सोडविला जाईल असे आश्वासन सभापती सुभाष कांबळे यांनी दिले. या मोर्चात प्रकाश कोठुळे, कैलास असोले, गजानन दळवी, बाळू लोंढे, प्रताप बोडखे, सतीश गवळी, गजानन भुरे, नरेंद्र हाळसे, सुनील भरकाडे, संजय कोळसे, सुरेश गवळी, शिवाजी पानपट्टे, पांडुरंग बंदुके यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी)
सावरगावच्या महिलांचा घागर मोर्चा
By admin | Updated: December 4, 2015 02:35 IST