दारव्हा पथकाची कामगिरी : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमदारव्हा : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील सात विद्यार्थ्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विविध रोगांवरील या शस्त्रक्रिया सावंगी (मेघे) यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयांमध्ये करण्यात आल्या. वरील कार्यक्रम पथकातील डॉक्टरांनी दारव्हा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यातील काही विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांना विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) व वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ या ठिकाणी भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामध्ये अनस अय्या पठाण खान माहुली, सूरज ठोकळ कामठवाडा, जय नारनवरे, आदित्य नारनवरे बोरी, धीरज खोडे तळेगाव, सृष्टी अवचट हातगाव आदींचा समावेश आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धोटे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील डॉ. जितेंद्र जाधव, डॉ. प्रिया शिरभाते, डॉ. योगेश दुद्दलवार, औषध निर्माण अधिकारी प्रवीण दुधे, सुनीता पुडके, कविता येंडे, शिल्पा गायनर यांनी या शस्त्रक्रियेकरिता परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)पालकांना दिलासाशस्त्रक्रिया करण्यात आलेली सातही बालके अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. या मुलांच्या आजारावर उपचार करण्याची त्यांची इच्छा असली तरी आर्थिक स्थिती तेवढी सक्षम नाही. त्यामुळे राष्ट्रीय बाल स्वस्थ्य कार्यक्रमाचा या सात मुलांना व त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. मुलांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
जिल्हा परिषद शाळांतील सात विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया
By admin | Updated: November 30, 2015 02:19 IST