प्रशासनाला आली जाग : उमरीपठार वृध्दाश्रमात मिळणार आधारयवतमाळ : महिनाभरापूर्वी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात अपघातग्रस्त अवस्थेत सुंदराबाई बडे या ८० वर्षीय महिलेस सोडून देण्यात आले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच शासकीय यंत्रणा कामाला लागली. समाज कल्याण विभागाने पुढाकार घेऊन सुंदराबाईला उमरीपठार (ता.आर्णी) वृध्दाश्रमात आश्रय देण्याचा निर्णय घेतला आहे. तसा लेखी आदेश शनिवारी समाज कल्याण विभागाने काढला.डोबरी (वरझडी) या गावच्या सुंदराबाई बडे यांना महिनाभरापूर्वी अपघातग्रस्त अवस्थेत नातेवाईकांनी सोडून दिले. उपचार घेऊन महिना उलटला. मात्र सुंदराबाईला नेण्यासाठी कुणीही आले नाही. यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाने सुंदराबाईला बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी या प्रकरणात समाज कल्याण विभागाशी संपर्क साधला. समाज कल्याण अधिकारी जया राऊत यांनी संत ढोलाराम महाराज वृध्दाश्रमात जागा रिक्त असल्याचे सांगितले. सुंदराबाईला बेवारस अवस्थेत सोडल्यामुळे अशा स्थितीत त्यांच्या देखभालीसाठी आश्रमातच व्यवस्था करण्यात येणार आहे. शनिवारी सुंदराबाईच्या प्लास्टर काढण्यात आले. मात्र जखम न भरल्याने त्यांना पुन्हा प्लास्टर करण्यात आले. रवींद्र निचल आणि कापसे यांच्या मदतीने सुंदराबार्इंना उमरी पठार वृध्दाश्रमात हलविण्यात आले. यासाठी लोकवर्गणी करण्यात आली. सायंकाळच्या सुमारास खासगी वाहनाच्या मदतीने सुंदराबार्इंना वृद्धाश्रमाकडे पाठविण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. (शहर वार्ताहर)
सुंदराबाईला समाज कल्याणची मदत
By admin | Updated: May 17, 2015 00:06 IST