नेर : पंचायत समितीच्या ढेपाळलेल्या कारभारामुळे तालुक्यातील नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहे. कुठलेही काम वेळेत होत नसल्याने त्यांना वारंवार या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. असाच काहीसा अनुभव वटफळी येथील नागरिकांना आला. त्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. यासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. कुठलेही काम तत्काळ निकाली काढण्याची या पंचायत समितीला जणू अॅलर्जी झाली आहे. घरकुलासोबतच विविध प्रकारच्या लोकोपयोगी योजना राबविण्यात या पंचायत समितीकडून विलंब केला जातो. वटफळी येथील रमाई आवास योजनेच्या कायम प्रतीक्षा यादीला ग्रामपंचायतीने मंजुरात दिली. मात्र पंचायत समितीने हा अहवाल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सादर केला नाही. परिणामी लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित राहावे लागले. सन २०१२ च्या दारिद्र्यरेषे खालील कार्डानुसार १५८ लोकांच्या नावाचा समावेश घरकूल यादीत करण्यात आला होता. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही पंचायत समितीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला यादी पाठविली नाही. ग्रामपंचायतीनेही यात हयगय केल्याचा आरोप आहे. पंचायत समितीने आता आपली जबाबदारी झटकली आहे. दरम्यान पंचायत समितीने संबंधित ग्रामसेवकांना ही यादी मागविली. परंतु देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे सांगितले जाते. आता घरकुलाच्या यादीत नवे असलेल्या लोकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. घरकूल याद्यांवर आठ दिवसात निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा विश्वंभर जांभुळकर, शेखर गजभिये, रवींद्र राऊत, सुरेश तिरपुडे यांनी दिला आहे. यावर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
नेर पंचायत समितीच्या कारभाराने गाठला कळस
By admin | Updated: December 11, 2014 23:15 IST