पिंपळखुटी : जंगलात रात्र गस्तीवर असलेल्या पथकावर लाकूड चोरट्यांनी हल्ला चढविला. बेदम मारहाणीत तीन वनरक्षक गंभीर जखमी झाले आहे. ही घटना जामणी वनपरीक्षेत्राअंतर्गत मुधाटी जंगलात रविवारी रात्री घडली.सुभाष दत्तू पिकलीकवार, किष्टन्ना नरसीमलू पुल्लेनवार व दिनेश विठ्ठल भोयर अशी जखमी वनरक्षकांची नावे आहेत. रविवारी मध्यरात्रीनंतर २.३० वाजताच्या सुमारास वन विभागाचे पथक गस्तीवर होते. मुधाटी ते कमळवेल्ली रस्त्यावर लाकूड चोरट्यांना पकडण्यासाठी दबा धरून बसले होते. या पथकाला सहा लाकूड चोरटे सागवान चौपटी डोक्यावर घेऊन येताना दिसले. त्यांना पथकाने रंगेहाथ पकडले. मात्र तीन लाकूड चोरट्यांनी पथकवरच हल्ला चढविला. तीन वनरक्षकांना काठीने बेदम मारहाण केली. एक चोरटा वगळता इतर चोरटे झटापटीत तेथून पसार झाले. पसार झालेल्यांपैकी भीमराव सुपारी आत्राम, सोनू अय्या टेकाम व कपलू अय्या टेकाम या तिघांना वनरक्षक ओळखतात. त्यांच्याशिवाय अज्ञात तीन चोरटे होते. या घटनेची माहिती जामणी क्षेत्राचे वनपरीक्षेत्राधिकारी यशवंत नागुलवार यांना देण्यात आली. त्यांनी त्वरित घटनास्थळ गाठून जखमी वनरक्षकांना प्रथम पाटण येथे आणले. तेथील पोलीस ठाण्यात नागुलवार यांनी तक्रार दाखल केली. पाटणचे ठाणेदार दिलीप मसराम यांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. यासोबतच लाकूड चोरट्यांविरूद्ध भादंवि कलम ३९५ नुसार दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वनविभागाची दरोड्याचे कलम लागलेली ही पहिलीच घटना असल्याची माहिती आहे. (वार्ताहर)
वन पथकावर सागवान तस्करांचा हल्ला
By admin | Updated: December 15, 2014 23:08 IST