समस्या जैसे थे : ‘आऊटपूट’ झिरो, शेतकरी आत्महत्या सुरूच यवतमाळ : मुख्यमंत्र्यांनी विकासासाठी टार्गेट केलेल्या यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक महसूल उपविभागाला एक उच्चपदस्थ सनदी अधिकारी पालक सचिव म्हणून देण्यात आले होते. मात्र अलिकडे त्यांचे आपल्या उपविभागातील दौरे थंडावले असून तेथील समस्या मात्र ‘जैसे थे’च असल्याची ओरड नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने वैदर्भीय मुख्यमंत्री लाभले. युती सरकार स्थापन होताच फडणवीस यांनी विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत केले. येथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अकोलाबाजार परिसरातील पिंपरी बुटी या एका गावात रात्रीचा मुक्कामही ठोकला होता. गावकऱ्यांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. या समस्या मार्गी लागाव्या म्हणून सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रत्येक महसूल विभागासाठी पालक म्हणून नियुक्तीही केली गेली. त्यात यवतमाळला दिनेशकुमार जैन, वणी मुकेश खुल्लर, दारव्हा व्ही.गिरीराज, पुसद के.एच. गोविंदराज, उमरखेड राजगोपाल देवरा, राळेगाव विकास खारगे तर केळापूर महसूल उपविभागाला पालक सचिव म्हणून पी.के. देशमुख यांची नियुक्ती केली गेली होती. पूर्वी संपूर्ण जिल्ह्याला एक पालक सचिव होते. मात्र शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येक उपविभागाला एक पालक सचिव दिला गेला. या सचिवांनी आपल्या उपविभागात एक-दोन दौरे करून आढावा बैठका घेतल्या. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हे सचिव उपविभागात फिरकले नसल्याचे गावकरी सांगतात. मुंबईत वातानुकूलित कक्षात बसणाऱ्या सचिवांना थेट उपविभागात पाठवूनही तेथील समस्या मार्गी लागल्या नसल्याची ओरड ऐकायला मिळते. एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली असेल तर त्यावर लक्ष केंद्रीत करून या आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याची व त्यावर इतरांच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची जबाबदारी या सचिवांवर सोपविली गेली होती. मात्र त्यांच्या ‘उपाययोजना’ फारश्या उपयोगी ठरल्या नाही. आजही या सर्वच महसूल उपविभागात शेतकरी आत्महत्या होताना दिसत आहे. त्या मागील कारण दुसरे-तिसरे काही नसून नापिकी व कर्जबाजारीपणा हेच असल्याचे पुढे आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) गावकरी म्हणतात, ग्रामसेवक-तलाठी भेटले तरी देव पावला प्रत्येक महसूल उपविभागाला थेट प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी दिल्याने ग्रामीण जनता ‘रिलॅक्स’ होईल, शासकीय स्तरावर कामे मार्गी लागण्याबाबतची ग्वाही मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र ‘आम्हाला सचिव नको, तर गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, आरोग्य सेविका’ ही गाव प्रशासनातील मंडळी दररोज उपलब्ध व्हावी, अशा अपेक्षांचा सूर गावकऱ्यांमधून ऐकायला मिळाला. गाव प्रशासनातील मंडळी वेळेवर उपलब्ध झाली तरी आमची कामे क्षणात मार्गी लागतील, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. यवतमाळात अनेक आढावा बैठक झाल्या मात्र त्यात हे पालक सचिव दिसले नाही.
उपविभागीय पालक सचिवांचे दौरे थंडावले
By admin | Updated: December 11, 2015 02:59 IST