एसटीचा संप : प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कामगारांचा एल्गारवणी : राज्य परिवहन महांडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने गुरूवारी वणी, पांढरकवडा, मारेगाव व झरी तालुक्यातील प्रवाशांसोबत विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. वाहतूक ठप्प पडल्याने प्रवाशांना अवैध प्रवासी वाहतुकीचा आधार घ्यावा लागला.विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरूवारी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेसने (इंटक) संपाची हाक दिली होती. त्याला वणी व पांढरकवडा आगारात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. परिणामी वणी व पांढरकवडा आगारातून सुटणाऱ्या बसफेऱ्या गुरूवारी सकाळपासूनच सुटल्या नाहीत. वणी आगारातून सकाळपासून एकही बस आगाराबाहेर निघाली नाही. सर्व बस आगारातच उभ्या होत्या. एस.टी. कर्मचाऱ्यांनी आगार परिसरातच ठिय्या मांडला होता. वणी आणि पांढरकवडा ही दोनही उपविभागीय ठिकाणे आहेत. या ठिकाणी दररोज चार तालुक्यातील ग्रामस्थ विविध कामांसाठी येतात. विविध कार्यालयातील शासकीय कर्मचारीही दररोज अप-डाउन करतात. मात्र गुरूवारी संप असल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले. बाहेरगावावरून येणाऱ्या प्रवाशांना परत जाण्यासाठी बसच नव्हती. सोबतच शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही गुरूवारी शाळेपासून मुकावे लागले, अन्यथा खासगी प्रवासी वाहुतकीचा आधार घेऊन पोहोचावे लागले. वणी येथून अनेक कर्मचारी मारेगाव व झरीला दररोज जाणे-येणे करतात. वणीत तालुक्यातून महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. या सर्वांना गुरूवारी संपाचा फटका बसला. इतर सामान्य प्रवाशांनाही अवैध वाहतुकीचा आश्रय घ्यावा लागला. अनेक प्रवासी चौकशी कक्षाजवळ उभे राहून बसची विचारणा करीत होती. मात्र तेथेही कुणीच नव्हते. त्यामुळे सर्वच प्रवशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. या संपात वणीत १४0 कर्मचारी सहभागी होते. आगाराचे जवळपास तीन लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले. ४१ बसफेऱ्या बंद होत्या. केवळ मानव विकास मिशनच्या चार बस तेवढ्या आगाराबाहेर पडल्या होत्या. वेतनवाढीची मुख्य मागणी असल्याने या संपाला इंटकशिवाय इतर संघटनांनीही पाठींबा देत संपात सहभाग घेतला होता. परिणामी हा संप १00 टक्के यशस्वी झाल्याचा दावा इंटकने केला आहे. इतर संघटनांचे सदस्यही संपात सहभागी झाल्याने संप यशस्वी ठरला. (कार्यालय प्रतिनिधी)काय आहेत एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्याराज्य वीज वितरण कामगारांप्रमाणे २५ टक्के पगारवाढ मिळण्याकरिता औद्योगीक कलह कायदा १९४७ मधील तरतुदीनुसार कामगार करार रद्द करावा, अशी संपकऱ्यांची प्रमुख मागणी होती. याशिवाय एमएसईबीप्रमाणे २५ टक्के पगारवाढ द्यावी, सन २००२ ते २०१२ पर्यंत ज्या कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांनी तीन वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केली, त्यांना नियमित वेतनश्रेणी देऊन वेतन निश्चिती करावी, चालक व वाहकांचे ड्युटी अलोकेशन संगणीकृत करून टी-९ रोटेशनची अंमलबजावणी करावी, कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१२ नंतर नियमित वेतनश्रेणी देताना कराराचा लाभ द्यावा, चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांकरिता संगणीकृत रजा व्यवस्थापन लागू करावे, करारामुळे झालेल्या वेतन निश्चितीमधील त्रुटी दूर कराव्यात, सर्व यांत्रिक कर्मचाऱ्यांना ग्रेडेशनचा लाभ द्यावा, कर्मचाऱ्यांच्या आपसात विनंती बदल्या कराव्या, आदी मागण्यांसाठी हा संप होता.पांढरकवडा येथेही संप यशस्वीपांढरकवडा : इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांकरिता पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय संपाला येथेही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संपात आगारातील कामगार, चालक व वाहक सहभागी झाले होते.गुरूवारी सकाळपासून येथील आगारातून एकही बस बाहेर पडली नाही. एकही बस फलाटावर लागली नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी खासगी वाहनाने, तर काही ठिकाणी तेलंगणा परिवहनच्या वाहनांमुळे प्रवाशांना थोडा दिलासा मिळाला. या बंदमुळे आगाराचे लाखोंचे नुकसान झाले. या संपाचे नेतृत्व इंटकचे तालुकाध्यक्ष मंगेश बावनकुळे यांनी केले. आगारातील ३१० कर्मचारी संपात सहभागी झाले. सकाळपासून बसफेऱ्या बंद होत्या. या संपाला इतरही संघटनांनीही पाठींबा दिला. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झााले. कित्येक प्रवाशी संप त्वरित संपून बस सुटेल, अशी अपेक्षा धरून बसस्थानकाच्या परिसरातच बसून होते. (शहर प्रतिनिधी)
विद्यार्थी, चाकरमान्यांचे हाल
By admin | Updated: December 18, 2015 02:57 IST