यवतमाळ : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासनाकडून ८१२ अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देण्यात येते. प्रत्यक्षात मात्र यावर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच मिळालेली नाही. मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातूनच बाहेर पडावे असा कुटील डाव शासनकर्त्यांकडून रचल्या जात असल्याचा आरोप ओबीसी क्रांती दलाने केला आहे. यासाठी मंगळवारी ३१ मार्च रोजी सकाळी ११ वाजता महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ्याजवळून ब्लॅकमार्च काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने १९९८ मध्ये तब्बल ८१२ अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती लागू केली होती. त्यानंतर ही यादी कमी करून केवळ ४५९ अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देने कायम ठेवले आहे. राज्य सरकारने अभ्यासक्रमांना मान्यता प्राप्त असतानासुद्धा मागासवर्गीय संवर्गातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी, एसटी च्या विद्यार्थ्यांना शासनमान्य विद्यालयातसुद्धा शिष्यवृत्ती देण्यात येत नाही. केंद्र सरकारने शिष्यवृत्ती योजनंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम असलेली नर्सिंग स्कूल, जीएनएम, एएनएम अभ्यासक्रमांमधील प्रशिक्षणार्थिंना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवले आहे. देशातील आजाराचे प्रमाण आणि लोकसंख्या पाहता येथे मोठ्या प्रमाणात नर्सेसची आवश्यकता भासते. देशाचे आरोग्य संवर्धनाकरिता या अभ्यासक्रमाला विद्यार्थिंनी येणे आवश्यक आहे. असे असतानासुद्धा त्याची शिष्यवृत्ती थांबविण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आणले जात आहे. या विरोधातच ओबीसी क्रांती दलाने आझाद मैदानाजवळील महात्मा जोतिराव फुले यांच्या पुतळ््यापासून ब्लॅकमार्च काढण्यात येणार आहे. ओबीसी क्रांतीदलाचे सरचिटणीस अॅड़ राजेंद्र महाडोळे, जिल्हा सरचिटणीस जितेंद्र हिंगासपुरे, संजय पारधी, अविनाश धोटे, पद्माकर काळे, सुरेश चुनारकर, राजेश चौधरी, पिंटू बांगर, दिप्ती कडूकर, श्वेता देवतळे, अश्विनी चौधरी, विद्या डंभारे, अश्विनी तिजारे, वैष्णवी मुके, सुजाता बघमारे आदींसह अनेक विद्यार्थी सहभागी होणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार
By admin | Updated: March 30, 2015 02:01 IST