यवतमाळ : एसटी विभागाच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम मिळणार असल्याचे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र शाखा यवतमाळचे अध्यक्ष भास्कर भानारकर यांनी कळविले आहे. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालयास व केंद्रीय श्रम मंत्रालय दिल्ली यांना नियमानुसार पेन्शनची मागणी केली असता इपीएस १९९५ कलम १० (२) नुसार जर कामगार सलग ५८ वर्षे सेवा पूर्ण करीत असेल तर अशाच निवृत्तांना दोन वर्षे वेटेज देण्यात येईल, म्हणजे २३ जुलै २००९ पर्यंत सेवा निवृत्त होणाऱ्यांनाच दोन वर्ष जादा धरून त्या वर्षाचा फॅक्टर रेट देण्यात येईल. यामधील फरक १८६ रुपये प्रती महाप्रमाणे २३ जुलै २००९ पर्यंतच्या सेवा निवृत्तांना त्याचा लाभ मिळेल. ज्यांचे मूळ वेतन ६ हजार ५०० पेक्षा कमी असेल अशांना कमी प्रमाणात फरक मिळेल. यामध्ये निवृत्तांना एकूण एरिअस १५ ते २० हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे. हा फरक आॅगस्ट, सप्टेंबर २०१४ दरम्यान मिळणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. हे नियमानुसार असणारे देयकेसुद्धा शासनाकडून मिळविण्यासाठी संघटनेला चांगलाच रेटा लावावा लागला. जे निवृत्त संघटनेचे सभासद नसतील त्यांनी आजीवन सभासद व्हावे आणि तसा अर्ज त्वरित भरून द्यावे, असेही संघटनेने म्हटले आहे. २४ जुलै २००९ नंतर निवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न हायकोर्टात प्रलंबित आहे. त्यामध्ये पेन्शन मधील फरक कमीत कमी पाचशे ते सातशे रुपये पर्यंतचा आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे संघटनेने सांगितले आहे. यासोबतच महाराष्ट्र व कर्नाटकच्या निवृत्त कामगारांनी सुप्रिम कोर्टात केस जिंकून पैसा घेतला आहे. ते दोन्ही आदेश सोबत जोडल्यामुळे यामध्ये मिळणारी रक्कम ही दीड ते दोन लाख रुपयांपर्यंतची असल्याचे संघटनेचे अध्यक्ष भास्कर भानारकर, सचिव नत्रेश चव्हाण, कोषाध्यक्ष रतन पवार, डी.के. भगत यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)
एसटीच्या निवृत्तांना थकबाकी मिळणार
By admin | Updated: June 22, 2014 00:14 IST