यवतमाळ : प्रस्तावित रोड ट्रान्सपोर्ट आणि सेफ्टी बिल रद्द करावे या मागणीसाठी नॅशनल फेडरेशन आॅफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स फेडरेनने आयोजित केलेल्या देशव्यापी परिवहन बंद आंदोलनाला यवतमाळ जिल्ह्यात समिश्र प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सहभागी झाल्याने जिल्ह्यातील ३७८ फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. सकाळी १०.३० वाजता आंदोलन मागे घेतल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.देशव्यापी परिवहन बंद आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे सकाळी ७ ते १०.३० या वेळात धावणाऱ्या ३७८ बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यात यवतमाळ आगाराच्या ३०, पुसद आगार ५६, वणी आगार ४८, उमरखेड आगार ८०, दारव्हा आगार २८, पांढरकवडा आगार २६, नेर आगार ३८, दिग्रस आगार २०, राळेगाव आगार ५२ अशा फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. लग्नसराईच्या दिवसात पुकारलेल्या या संपाने प्रवाशांना मोठा फटका बसला. अनेक प्रवासी सकाळी लग्नसमारंभाला जाण्यासाठी बसस्थानकावर आले. मात्र एकही बस धावत नसल्याने त्यांची धांदल उडाली. यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर सकाळी प्रवाशांची गर्दी दिसत होती. मात्र १०.३० वाजताच्या दरम्यान परिवहन मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. राज्य परिवहन महामंडळाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)
एसटीच्या ३७८ फेऱ्या रद्द
By admin | Updated: May 1, 2015 01:58 IST