बनावट दागिने : ग्राहकाला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्नढाणकी : ग्राहकांना बनावट सोन्याचे दागिने विकून फसवणूक करणाऱ्या व जबरीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील सराफा व्यावसायिकाविरुद्ध बिटरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला. खंडू यादव टिकणे व संगीता खंडू टिकणे या दाम्पत्यास अटक केली आहे. आरोपी खंडू टिकणे याच्याकडून फिर्यादी सुरेखा तानाजी ब्रिदाने यांनी मुलीच्या लग्नासाठी २१ तोळे सोन्याचे दागिने बनविले. त्यांची किमत ६ लाख १७ हजार ४०० रुपये आहे. दागिने दोन महिन्यातच काळे पडल्याने दागिने बदलून देण्यासाठी आरोपीकडे आणले. मात्र, टिकणे याने खरेदीच्या पावत्या परत घेऊन दागिन्याच्या किमतीचा धनादेश फिर्यादीस दिला. धनादेशाची रक्कम दिवाळीपर्यंत (२०१५) क्लिअर करतो किंवा सोने देतो, असे सांगितले. मुदत संपल्यानंतर सुरेखा ब्रिदाने दागिने मिळविण्यासाठी अनेक वेळा आरोपीकडे गेल्या. परंतु कधी तुमच्या नावाने जमीन करून देतो, असे सांगून तर कधी नागरिकांना मध्यस्थी करावयास लावून आरोपीने चालढकल केली. २४ एप्रिल २०१६ रोजी सुरेखा ब्रिदाने या पती नानाजी ब्रिदाने यांना घेऊन आरोपीकडे गेल्या असता आरोपीने फिर्यादीस दुकानात बसवून ठेवले. तुम्हाला दागिने किंवा दागिन्याची किमत आणून देतो, असे सांगितले. सायंकाळी ५.३० च्या सुमारास आरोपी दुकानात आला. नानाजी ब्रिदाने लघुशंकेसाठी बाहेर गेले होते. आरोपीने सुरेखास दागिने न दिल्यास काय करणार, असे दरडावले. आरोपीची पत्नी संगीता टिकणे हिने तर आता हिची सोय लावलीच पाहिजे, असे म्हणून विषारी औषधाची बाटली फिर्यादीच्या तोंडात ओतली. त्यावेळी दुकानासमोरून जाणाऱ्या एका महिलेने आरडाओरड केल्यामुळे भारत तुपेकर, विनायक तुपेकर, वसंता राठोड यांनी सुरेखाची आरोपीच्या तावडीतून सुटका करून दवाखान्यात दाखल केले. अखेर सुरेखा ब्रिदाणे यांनी शुक्रवारी बिटरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार सुरज बोंडे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. (वार्ताहर)
ढाणकीतील सराफा दाम्पत्यास अटक
By admin | Updated: June 5, 2016 02:13 IST