आर्णी : तालुक्यातील केळझरा (वरठी) येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयात बीडीओंच्या कक्षामध्ये ठिय्या आंदोलन केले. गुरूवारी दुपारी हे विद्यार्थी आपली मागणी घेऊन बीडीआेंच्या कक्षात आले. गेल्या वर्षभरापासून गावातील शाळेवर शिक्षक द्यावा ही मागणी विद्यार्थी व पालकांनी लावून धरली आहे. प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत आहे. केळझरा येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेवर शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एकीकडे शासनाने शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी केली आहे. प्रत्यक्षात मात्र विद्यार्थ्यांना शिक्षकांसाठी आंदोलन करण्याची वेळ येत आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभागात वर्षभरच शिक्षकांच्या रिक्त जागांचा सावळा गोंधळ सुरू असतो. अनेक शाळांवर अतिरिक्त शिक्षक आहेत. तर काही ठिकाणी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. वारंवार मागणी करूनही अशा शाळांना शिक्षक दिला जात नाही. केळझरच्या विद्यार्थी व पालकांनी यापूर्वी १५, १६ आणि १७ सप्टेंबरला थेट शाळेवर बहिष्कार टाकला होता. शाळाच उघडणे बंद झाल्याने तत्कालिन गटविकास अधिकाऱ्याने गावात येऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. येथे पूर्ण वेळ शिक्षक देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर मात्र शिक्षक आलाच नाही. या शाळेवर केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे येथील अध्ययनाचे काम पूर्णत: खोळंबले आहे. पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या निर्धारित केली जाते. प्रत्यक्षात मात्र येथे या निकषालाच मुठमाती दिली जात आहे. यामुळेच संतप्त झालेल्या विद्यार्थी व पालकांनी थेट गटविकास अधिकारी दीपककुमार मिना यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. यावेळी मिना हे कार्यालयात उपस्थित नव्हते. इतर कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाची माहिती मिना यांना दूरध्वनीवरून दिली. त्यानंतर तात्काळ मिना हे कार्यालयात आले. त्यांनी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करून तात्काळ एका शिक्षकांची केळझरा येथे नियुक्ती केली. परीविक्षाधीन अधिकारी म्हणून दीपककुमार मिना यांनी गटविकास अधिकाऱ्याची सुत्रे हाती घेतली आहे. मिना यांच्या कार्यकाळात तातडीने निर्णय होत आहेत. एकंदरच पंचायत समितीच्या प्रशासकीय कामाची गती वाढल्याने तालुक्यात समाधान व्यक्त केले जात आहे. (शहर प्रतिनिधी)
बीडीओच्या कक्षात ठिय्या
By admin | Updated: February 13, 2015 01:53 IST