सोनखासजवळची घटना : दुचाकीला धडक देऊन झायलो आदळली स्वीफ्ट कारवर सोनखास : भरधाव झायलो कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देऊन एका स्वीफ्ट कारवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात झायलो चालक जागीच ठार झाला. तर दुचाकीस्वारासह पाच जण गंभीर जखमी झाले. ही विचित्र अपघाताची घटना यवतमाळ-नेर मार्गावरील सोनखासजवळील वळणावर सोमवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.रमेश सोमनाथ मामेडवार (३५) रा. बाबूपेठ चंद्रपूर असे ठार झालेल्या झायलो चालकाचे नाव आहे. तर दुचाकीस्वार विजय रामचंद्र आडे (३२), विनायक राठोड (२५) रा. दोघेही कामनदेव ता. नेर आणि स्वीप्ट कारमधील नरेश टाले, अतुल शिंदे दोघे रा. यवतमाळ आणि पराग गुल्हाने रा. नेर असे जखमींचे नाव आहे. सोमवारी सकाळी नेरकडून झायलो कार (एम.एच.३४-एए-५४२२) यवतमाळकडे जात होती. सोनखास गावाजवळ समोरुन येणाऱ्या दुचाकीला (एम.एच.२९-एपी-२७५३) झायलो कारने जबर धडक दिली. त्याच वेळी समोरुन येणाऱ्या स्वीफ्ट कार (एम.एच.२९-एबी-६६२) लाही झायलोची धडक बसली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यात झायलो चालकाची मान गाडीखाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन पडले. त्या दोघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. तसेच स्वीफ्ट कारमधील तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताचे वृत्त कळताच सोनखास येथील नागरिकांनी धाव घेतली. जखमींना तत्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच लाडखेड ठाणेदार नरेश रणधीरही घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताने नेर-यवतमाळ मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. (वार्ताहर)
विचित्र अपघातात एक ठार, पाच गंभीर
By admin | Updated: May 3, 2016 02:59 IST