अन्यायाला फुटणार वाचा : वैदर्भीय कलावंतांची निर्मिती ‘झरी’ लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून आ वासून उभा असलेला आणि अख्ख्या महाराष्ट्राचे जनमानस हादरवून सोडणारा ‘कुमारी मातां’चा प्रश्न आता चित्रपटाच्या पडद्यावर येत आहे. व्यवस्थेच्या बळी ठरलेल्या जिल्ह्यातील शेकडो महिलांची कडवट कहाणी जगापुढे मांडण्यासाठी वैदर्भीय कलावंतांनी ‘झरी’ सिनेमा साकारला असून ९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या डिजिटल युगातही अनेक गावे व्यवस्थेचे बळी ठरत आहे. झरी जामणीसारख्या तालुक्यात कुमारी मातांची समस्या अत्यंत विदारक बनली आहे. परप्रांतीय ठेकेदार महाराष्ट्रातील तेंदूच्या जंगलात येतात. तेथील अत्यंत गरीब आणि भोळ्या भाबड्या मुलींना किडुकमिडुक वस्तूंचे प्रलोभन दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. परिणामी अशा दुर्गम भागात अनेक मुली ठेकेदारांच्या वासनेच्या शिकार होऊन कुमारी मातेचे लाजिरवाणे जिणे जगत आहेत. हे अमानुष कृत्य थांबावे या हेतूने ‘झरी’ हा चित्रपट साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती राधा बिडकर व कुंदन ढाके (अकोला) यांनी केली. संवाद, पटकथा व दिग्दर्शन राजू मेश्राम यांचे आहे. चित्रपटातील ‘झरी’ ही शीर्षक भूमिका नम्रता गायकवाड हिने साकारली आहे. मिलिंद शिंदे, अनिकेत केळकर, कमलेश सावंत, अनंत जोग, नागेश भोसले, निशा परुळेकर व तुकाराम बिडकर यांच्याही भूमिका आहेत. प्रवीण कुवर यांचे सुश्राव्य संगीत लाभले असून कविवर्य विठ्ठल वाघ, किशोर बळी, अनंत खेळकर यांनी गीतलेखन केले आहे.
कुमारी मातांची कडवट कहाणी येतेय सिनेमाच्या पडद्यावर
By admin | Updated: June 8, 2017 01:21 IST