पुतळा विटंबना : राज्य मार्गावर टायर जाळले, वाहनांच्या दुतर्फा रांगा आर्णी : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ बुधवारी जवळा येथे महामार्गावर चार तास रास्ता रोको करण्यात आला. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, संतप्त नागरिकांनी रस्त्यावर टायर जाळून घटनेचा निषेध नोंदविला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दारव्हा, दिग्रस, लाडखेडसह यवतमाळ येथून पोलिसांची जादा कुमक बोलाविण्यात आली होती. जवळा बसस्थानकाजवळ असलेल्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी काही लोकांच्या लक्षात आला. ही वार्ता गावात पोहोचताच जमाव एकत्र आला. त्यांनी महामार्ग अडवून धरत टायर पेटविले. दरम्यान, आर्णीचे ठाणेदार संजय खंदाडे हे ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्यांनी वरिष्ठांशी संपर्क केला. उपविभागीय अधिकारी कल्पना भराडे तत्काळ दाखल झाल्या. पाठोपाठ विविध ठिकाणचे पोलीस दाखल झाले. यवतमाळवरून डॉग स्कॉड पाचारण करण्यात आले. शिवाय उपविभागीय अधिकारी विकास माने, आर्णीचे तहसीलदार सुधीर पवार, तलाठी श्याम रणनवरे आदी यावेळी उपस्थित होते. महिला आणि पुरुषांनी महामार्गावर ठिय्या दिला. जानेवारी महिन्यातही अशाच प्रकारची घटना येथे घडली होती. त्यावेळीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र पोलीस कुणालाही ताब्यात घेऊ शकले नाही. आजही डॉग स्कॉड माग काढू शकले नाही. उपस्थित अधिकाऱ्यांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणात आणली. गावकऱ्यांच्या सहकार्याने पुतळ्याची स्वच्छता करून उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राहुल मुजमुले, प्रा.नरेश रामटेके, लता रामटेके, राजू मुजमुले, दिलीप कावरे, राहुल डंभारे, भीमराव मुजमुले, ज्ञानदीप धाबर्डे, विमल मुजमुले, संजय सुखदेवे, पुरुषोत्तम कोसे, कुमार मेश्राम, गजानन मुजमुले, अमोल मुजमुले आदी उपस्थित होते. दरम्यान, या घटनेची तक्रार पुतळा समितीचे अध्यक्ष राहुल मुजमुले यांनी पोलिसात दिली. सदर प्रकरणी आरोपींना हुडकून काढत कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. तर उपविभागीय पोलीस अधिकारी भराडे यांनी आरोपींना लवकरच शोधून काढले जाईल, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)
जवळा येथे चार तास रास्ता रोको
By admin | Updated: July 16, 2015 02:36 IST