ट्रेलरची वृध्दास धडक : दोन महिन्यानंतर अपघाताची पुनरावृत्तीसोनखास : नेर मार्गावरील लासिना येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वृद्धाला भरधाव ट्रेलरने धडक दिली. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजता घडली. दोन महिन्यांपूर्वी याचठिकाणी ट्रेलरने युवकाला चिरडले होते. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. मधु रामप्रसादसिंग ठाकुर (६२) रा. लासिना असे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सकाळी १० च्या सुमारास मधु ठाकुर हे नातवाला घेऊन घराबाहेर पडले होते. इतक्यात भरधाव ट्रेलरने मधु ठाकुर यांना धडक दिली. सुदैवाने ते चाकाच्या मधोमध पडल्यामुळे त्यांना केवळ गंभीर स्वरूपाची इजा झाली. याच ठिकाणी दोन महिन्यांपूर्वी त्याच ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रेलरने अभय गौतम सोनवने (३०) या तरुणाला चिरडले होते. त्याचा जागेवरच मृत्यू झाला. सातत्याने सिमेंट वाहतूक करणारे ठराविक ट्रान्सपोर्ट कंपनीचे ट्रेलर लासिना ग्रामस्थांच्या जीवावर उठल्याची भावना निर्माण झाली आहे. आजच्या घटनेतील ट्रेलर क्रमांक एमएच ४० वाय ५९ यातील हवा सोडून त्याच्या काचा फोडण्यात आल्या. कारवाईच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले. त्यामुळे तब्बल दीड तास येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. (वार्ताहर)गतिरोधकामुळे अपघात दोन महिन्यांपूर्वी ट्रेलरमुळे झालेल्या अपघातानंतर ग्रामस्थांच्या मागणीवरून येथे तब्बल १० गतिरोधक तयार करण्यात आले. त्यानंतर अपघाताची मालिकाच सुरू झाली. रोज या गतिरोधकांवरून कोसळून कुणीतरी जखमी होत होता. त्यामुळे शुक्रवारी बांधकाम विभागाने गतिरोधकांची संख्या कमी करण्याचे काम हाती घेतले. दोन गतिरोधक काढत नाही तोच शनिवारी सकाळी ट्रेलरने वृद्धाला धडक दिली. नियमित उंचीपेक्षा मोठे गतिरोधक असल्याने त्यावरून वाहन उसळून स्टेअरिंग फ्री होण्याची भीती वाढली आहे. यातूनच शनिवारचा अपघात झाल्याचे सांगितले जाते.
लासिना येथे पुन्हा रास्ता रोको
By admin | Updated: May 17, 2015 00:01 IST