पुसद : येथील वीज वितरण कंपनीच्या कारभाराने ग्राहक त्रस्त झाले असून ग्राहकांच्या तक्रारीचे त्वरित निराकरण करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या पुसद शाखेने कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या एका निवेदनातून दिला आहे.पुसद येथील वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांना रिडींगप्रमाणे बील न देता ‘एव्हरेज’ बिल देण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे काही ग्राहकांना वर्षभराचे बिल येत आहे. तसेच काहींना उशिरा बिले मिळत असल्याने त्यांच्यावर आर्थिक भूर्दंड बसत आहे. अनेकांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे त्यांंना कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत. त्याचप्रमाणे एकाचे बिल दुसऱ्या ग्राहकाच्या नावाने देणे आदी अनेक प्रकार कंपनीकडून वारंवार घडत आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक ग्राहक कंपनीच्या या भोंगळ कारभारामुळे त्रस्त झाले आहेत. याबाबतच्या असंख्य तक्रारी येथील ग्राहक कल्याण परिषदेकडे प्राप्त झाल्या असल्याने या तक्रारींची दखल घेत परिषदेने ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांकडे एक निवेदन सादर केले. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण न झाल्यास परिषदेच्यावतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्या आला आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष कय्यूम खान, शहराध्यक्ष मनीष दशरथकर, उपाध्यक्ष शेख साजीद, सचिव विष्णू धुळे, संघटक कृष्णा राऊत, कैलास श्रावणे, अरुण मुनेश्वर, जलीम खान, संजय सोनटक्के आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. काय कारवाई होते याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
वीज वितरण कंपनीच्या कारभाराने ग्राहक त्रस्त
By admin | Updated: February 7, 2015 01:41 IST