यवतमाळ : शहरात खुनाचे सत्र सातत्याने सुरूच असून शनिवारी रात्री झालेल्या तिहेरी हत्याकांडानंतर रविवारी पुन्हा येथील धामणगाव मार्गावर एसटी वाहकाचा खून झाला. सततच्या या घटनांमुळे शहर हादरले असून खुनाचे सत्र थांबविण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. कमलेश शंकरप्रसाद शुक्ला (५०) रा. सावित्रीबाई फुले सोसायटी वाघापूर असे मृताचे नाव आहे. ते वाहक म्हणून यवतमाळ आगारात कार्यरत होते. यांचा मृतदेह रविवारी रात्रीच्या सुमारास येथील धामणगाव मार्गावरील एका खासगी शाळेच्या मागे असलेल्या एका वसतीगृहाजवळ आढळून आला. त्यांचा दगडाने ठेचून खून केल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतक कमलेश शुक्ला हे रविवारी सकाळीच घरून गेले होते. दुपारी त्यांच्यासोबत कुटुंबीयांचे बोलणे झाले असता मित्राकडे जेवणासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाणे गाठून त्यांच्या हरविल्याची तक्रार दिली. पोलिसांनी मध्यरात्री फोन करून त्यांच्या कुटुंबीयांना मृतदेह आढळल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळ गाठून ओळख पटविली. या प्रकरणी राजेंद्र शिवप्रसाद शुक्ला यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. शुक्ला यांना कुणी व का मारले याचा तपास पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)
एसटी वाहकाचा दगडाने ठेचून खून
By admin | Updated: October 27, 2015 02:50 IST