गृहराज्यमंत्र्यांची पत्रकार परिषद : ३२ औद्योगिक संस्थांची निवड, मुलींना प्राधान्ययवतमाळ : विदेशाच्या धर्तीवर राज्यात कमवा आणि शिका योजना राबविली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तत्काळ रोजगार मिळेल आणि कामाचे महत्त्व समजेल. मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या म्हणून प्रयत्न करण्यात येत असल्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.काही दिवसांपूर्वी राज्याचे एक शिष्टमंडळ न्यूयार्कला गेले होते. या ठिकाणी सहा ते सात विद्यापीठांची पाहणी करण्यात आली. त्या ठिकाणी गरीब अथवा श्रीमंत कुटुंबातील विद्यार्थी असला तरी कमवा आणि शिका हाच नियम वापरला जातो. यातून कमी दिवसात स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येते. हे विद्यार्थी स्वत: कमावतात आणि शिक्षणही घेतात. यामुळे पालकांवर त्याचे ओझे पडत नाही.याच धर्तीवर राज्यात मुलींना केंद्रस्थानी ठेवत स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासाठी आठ व्यावसायिक अभ्यासक्रमांची निवड करण्यात येणार आहे. त्याकरिता परदेशी कंपनीशी करार करण्यात आला आहे. राज्यातील ३१ आयटीआय संस्थांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये अमरावती विभागातील ८ आयटीआय संस्थांचा समावेश राहणार आहे. या ठिकाणावरून ५० हजार युवतींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये गावखेड्यातील पार्लरसारख्या नवीन व्यावसायाची भर घालण्यात आली आहे. यासारखे अनेक नवनवे उपक्रम गावपातळीवर चालणार असल्याचे ते म्हणाले. वकिलांच्या १५ वर्षाच्या सेवेनंतर पूर्वी ३० हजारांचा वेल्फेअर फंड दिला जात होता. त्याची मर्यादा आता तीन लाखापर्यंत करण्यात आली आहे. सागरी तळ मजबूत करण्यासाठी सागरमाला प्रोजेक्ट राबविला जात असल्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील म्हणाले. यामुळे दळणवळण स्वस्त होेणार आहे. तत्काळ सेवा पोहोचविण्यास मदत होणार असल्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, राजू पडगीलवार उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
‘कमवा आणि शिका’ योजनेला गती
By admin | Updated: February 29, 2016 02:00 IST