पुसद : सोयाबीनने दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली आहे. एवढेच नव्हे तर काढणीच्या खर्चा एवढेही उत्पन्न होणार नसल्याने शेतातील पिकांत जनावरे सोडण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे. कपाशी हे तोट्याचे पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची कास धरली. मात्र यंदा सुरूवातीला पावसाने दडी मारली. त्यानंतर पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी केली. सोयाबीन पीक ऐन भरात आले असतानाच पुन्हा पावसाने दडी मारली. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरल्याच नाही. अनेक शेतात तर शेगांमध्ये दाणेच तयार झाले नसल्याचे दिसून आले. सोंगणी आणि काढणीचा खर्च मोठा आहे. सोंगणी आणि काढणीचा खर्चही होणाऱ्या उत्पन्नातून निघणे कठीण आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन काढण्या ऐवजी त्यात जनावरे सोडण्याचा निर्णय घेतला. दरवर्षी शेतकऱ्यांची दिवाळी सोयाबीन पिकाच्या भरवशावर साजरी होत असते. मात्र सोयाबीन पीकच हातून गेल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गाची दिवाळी अंधारात जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन नुकसानीची पाहणी करावी तसेच सर्वे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी बांधवांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)
सोयाबीनचा दगा, दिवाळी अंधारात
By admin | Updated: October 16, 2014 23:31 IST