४९२ कोटींचे नुकसान : जिल्हा उपनिबंधकांचे शिक्कामोर्तबरूपेश उत्तरवार - यवतमाळनिसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या नगदी पिकाचे उत्पादन तब्बल १२ लाख ५० हजार क्विंटलने घटले असून शेतकऱ्यांचे तब्बल ४९२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. खुद्द जिल्हा उपनिबंधकांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. सन २०१३ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात चार लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. गेल्या वर्षी पीक परिस्थिती चांगली राहिल्याने उत्पादनही चांगले झाले. गतवर्षी तब्बल १८ लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन शेतकऱ्यांना झाले. त्याची किमत ७२० कोटी रुपये एवढी आहे. या वर्षी सोयाबीनचे क्षेत्र एक लाख क्विंटलने घटले. यंदा केवळ तीन लाख एक हजार ७११ हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली. मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्ता भूईसपाट झाला. दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबीन हातचा निघून गेला. सोयाबीनच्या दाण्याचा आकार ज्वारीऐवढा झाला आहे. सोयाबीनचे संभाव्य उत्पादन आणि त्याच्या काढणीचा खर्च याचा ताळमेळ न बसल्याने अखेर शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतात जनावरे चरण्यासाठी सोडली. यावरून सोयाबीनची स्थिती स्पष्ट होते. यावर्षी केवळ दीड लाख क्विंटल सोयाबीन झाले असून त्याची किमत ४८ कोटी रुपये आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचे उत्पादन १२ लाख ५० हजार क्विंटलने घटले असून हे नुकसान ४९२ कोटी रुपयांचे आहे, अशी माहिती यवतमाळचे जिल्हा उपनिबंधक (सहकार) जितेंद्र कंडारे यांनी ‘लोकमत’ला दिली. सोयाबीन पीक हातातून गेले. त्यामुळे आगामी पाच वर्षतरी शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्याची शक्यता नाही.
सोयाबीनचे उत्पादन १२ लाख क्विंटलने घटले
By admin | Updated: December 13, 2014 22:46 IST