आर्णी वनपरिक्षेत्र : मेटॅडोर पकडला, तस्कर फरार, ३५ सागवान झाडे आरीने कापलीलोणबेहळ : आर्णी वनपरिक्षेत्रात येत असलेल्या कोसदनी बीटातून सागवानाची ३५ झाडे तोडण्यात आली. कोसदनी घाटात संशयावरून पकडण्यात आलेल्या मेटॅडोरमध्ये हे लाकूड वाहून नेण्यात येत होते. दरम्यान, सागवान तस्कर फरार होण्यात यशस्वी झाले. मात्र घटनेवरून पाच दिवसांचा कालावधी लोटूनही कारवाई थंडबस्त्यात आहे. ५ सप्टेंबरच्या रात्री तस्करांनी कोसदनी बीटातील कुप क्र.११ मधील सागवानाची मोठमोठी झाडे आरीने तोडली. एम.एच.२१/६१५९ या क्रमांकाच्या ४०७ वाहनातून हे लाकूड वाहून नेले जात होते. सदर वाहन मार्गावर असताना कोसदनी ते धनोडा दरम्यान महामार्ग पोलीस चौकीवर पकडण्यात आले. पोलिसांनी तपासणी सुरू केली. त्यावेळी चालकाने मेटॅडोरमध्ये पक्षांचे खाद्य असल्याचे सांगितले. मात्र परिपूर्ण माहिती घेण्यापूर्वीच चालकाने तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक मुखबीर शेख हे सकाळी ७ वाजता दाखल झाले. त्यांनी मेटॅडोरवरील ताडपत्री काढली. त्यात सागवान आढळून आले. सदर मेटॅडोर आर्णी वनपरिक्षेत्र कार्यालयात लावण्यात आला. याठिकाणी चोरीच्या लाकडाची मोजदाद करण्यात आली. सदर प्रकारावरून पाच दिवसांचा कालावधी लोटला. परंतु सागवान चोरट्यांना शोधून काढण्यात वनविभागाला यश आले नाही. सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी गावंडे यांनी सांगितले. (वार्ताहर)
कोसदनी बिटात अवैध सागवान कटाई
By admin | Updated: September 11, 2016 01:01 IST