यवतमाळ : सूपर सिक्स गटातील चुरशीच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला लोळवून धावगतीच्या आधारावर स्कूल आॅफ स्कॉलर (एसओएस) यवतमाळ पब्लिक स्कूल, जायन्ट इंग्लिश मिडयम स्कूल यांनी वायपीएल - २०१४ च्या उपांत्यफेरीत थाटात प्रवेश केला. सेंट अलॉयन्सेस स्कूल, शिवाजी विद्यालय जवाहरलाल दर्डा इंग्लिश स्कूल या संघांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. येथील पोस्टल मैदानावर सुरू असलेल्या वायपीएल - २०१४ स्पर्धेत सुपर सिक्स गटातील शुक्रवारी खेळल्या गेलेल्या शेवटच्या साखळी सामन्यात जायन्टस् इंग्लिश स्कूल आणि स्कूल आॅफ स्कॉलर संघाने रोमहर्षक विजय मिळविला. वायपीएस संघाला जायन्टस् इंग्लिश स्कूलकडून चुरशीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतरही उत्कृष्ट धावगतीच्या आधारे वायपीएस संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळाले. सकाळच्या सत्रात वायपीएस विरूद्ध जायन्टस् इंग्लिश स्कूल या संघात महत्वपूर्ण सामना झाला. वायपीएस संघाने प्रथम फलंदाजी करत १५ षटकात आठ बाद ९३ धावा केल्या. सहर्ष मिंदेवारने सर्वाधिक २५ धावा केल्या, लाभसेटवार याने तीन तर मुनने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात जायन्टस् इंग्लिश स्कूलचा संघ फलंदाजीला उतरला स्नेह परांडे आणि हर्ष बाजोरिया या गोलंदाजांनी तीन-तीन गडी बाद करीत जायन्टस् संघाच्या फलंदाजांना दबावात ठेवले. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत गेला. शेवटच्या दोन षटकात जिंकण्यासाठी २४ धावांची आवश्यकता असताना सूरज (सहा चेंडूत १६ धावा) आणि आदर्श यांनी उत्कृष्ट फलंदाजी करीत संघाला शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवून दिला. सूरज बिस्वासला वायपीएस शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा यांच्या हस्ते ‘मॅन आॅफ द मॅच’ पुरस्कार म्हणून ५०० रुपये रोख देण्यात आले. दूसरा सामना या स्पर्धेतील अपराजित संघ स्कूल आॅफ स्कॉलर आणि शिवाजी विद्यालयात रंगला. एसओएस संघाने उभारलेल्या ९९ धावांच्या आव्हांनाचा पाठलाग करताना शिवाजी विद्यालयाचा संपूर्ण संघ १२.४ षटकात ७६ धावात गारद झाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. एसओएस संघाच्या राधेय गावंडे उत्कृष्ट गोलंदाजी करीत २० धावा देत चार गडी बाद केले. तर सुमीत काटे दोन, करण चौधरीने एक गडी बाद केला. १९ चेंडूत २७ धावा आणि चार गडी बाद करून अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या एसओएसच्या राधेयला ‘मॅन आॅफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. (क्रीडा प्रतिनिधी)
एसओएस, वायपीएस, जायन्टस् स्कूल उपांत्य फेरीत
By admin | Updated: November 22, 2014 01:53 IST