यवतमाळ : सडकी सुपारी आणि विविध अमली पदार्थ मिसळून बनावट गुटखा तयार करायचा. तसेच नामांकीत कंपनीच्या पॅकींगमध्ये भरून त्याची विक्री करायची. असा गोरखधंदा असलेल्या बनावट गुटखा कारखान्यावर धाड घालून पोलिसांनी पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई येथील छोटी गुजरी परिसरातील एका गोदामात बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. महेंद्र विश्वास रूपवने (३५) रा. उमरसरा असे अटकेतील कारखाना चालकाचे नाव आहे. तो येथील छोटी गुजरीतील एका गोदामात बनावट गुटखा तयार करण्याचा कारखाना चालवित असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल मदने यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी शहर ठाणेदार दिलीप चव्हाण यांना सोबत घेवून पथकासह तेथे धाड घातली. यावेळी कारखाना चालक महेंद्रला गुटखा तयार करताना रंगेहाथ अटक करण्यात आली. तसेच गोदामातून गुटखा तयार करण्याची एक लाख २५ हजार रूपये किमतीची मशीन, सुगंधीत तंबाखुचे खोके, चार मिनार किमाम, तलब आणि केतन गुटखाच्या पुड्याचे पोते असा एकूण पाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून जप्तीतील मुद्देमाल त्यांच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच कारखान्याचा मालक महेंद्र रूपवने याच्याविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्याला अटकही करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)
छोटी गुजरीत बनावट गुटख्याचा कारखाना
By admin | Updated: July 31, 2014 00:15 IST