शिक्षणाची किमया : ३०० घरांच्या गावातून ६० जणांची चांगल्या पदावर भरारीकिशोर वंजारी नेरगावखेड्यांना शिक्षणाचे महत्त्व कळल्यास ग्रामीण जनतेच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडू शकते. तालुक्यातील कोहळा या छोट्याशा गावाने हीच किमया साधली आहे. गावातील तब्बल दहा तरुणांनी क्लास वन अधिकारी पदावर भरारी घेतली आहे. तर इतर ६० तरुणांनी चांगली पदे पटकाविली आहेत. ३०० घरे असलेल्या आणि ५८५ मतदार असलेल्या या छोट्याशा गावाने वेगळा लौकिक केला आहे. कोहळा गावात पहिली ते सातवीपर्यंत जिल्हा परिषद शाळा होती. १९९८ मध्ये कोहळा प्रकल्पाचे काम सुरू झाल्याने गावाचे विभाजन झाले. तरीही बिकट परिस्थितीवर मात करीत प्राथमिक शिक्षण घेऊन येथील विद्यार्थ्यांनी प्रगती केली. कोहळा गावात शिकून दहा जण क्लास वन अधिकारी झाले. यात प्रकल्प कार्यकारी अभियंता प्रमोद तलवारे, रोजगार अधिकारी सुधाकर तलवारे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुधाकर बकाराम तलवारे, गटविकास अधिकारी सुनील तलवारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल तलवारे, डॉ. राहुल महादेव तलवारे यांचा समावेश आहे. तसेच अमरावती विभागीय बोर्डात सिद्धार्थ तलवारे, अभियंता म्हणून धनराज मोहोड यांचाही समावेश आहे. शिवाय ग्रामसेवक पुरुषोत्तम तलवारे, जानराव तलवारे, सुदर्शन तलवारे, धम्मपाल तलवारे कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून प्रफुल्ल तलवारे, चंद्रशेखर गुर्जर, हरिदास गुर्जर, भगवंत गुर्जर, रवींद्र बाढे, विवेक झाडे यांनीही प्रगती केली आहे. तलाठी हरिदास गुर्जर, रवींद्र गंधे, जयप्रकाश गुर्जर, हरेंद्र पारवे, पोलीस कर्मचारी अविनाश झाडे, एसटी वाहक चालक प्रदीप तलवारे, प्रवीण मोहोड, विकास डेरे, अमोल इंगोले, नितीन इंगोले, धीरज मनवर, बँक सरव्यवस्थापक प्रदीप झाडे यांच्यासह जयप्रकार गुर्जर, जितेंद्र दानवे, कृष्णा तलवारे, विकास तलवारे आदी ६० जण विविध पदांवर कार्यरत आहेत. एकेकाळी शिक्षणाचा गंध नसलेल्या कोहळा गावातील तरुणांनी घेतलेली झेप इतरांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. गेल्या १५ वर्षांपासून कोहळा प्रकल्पग्रस्तांचा सोयीसुविधा आणि मोबदला मिळविण्यासाठी प्रशासनासोबत संघर्ष सुरू आहे. एकीकडे संघर्ष, तर दुसरीकडे शिक्षण अशा दोन आघाड्यांवर येथील तरुणांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे. ग्रामीण गुणवत्तेचा हा दाखला ठरला आहे.
छोट्याशा कोहळा गावातून घडले दहा क्लास वन अधिकारी
By admin | Updated: September 25, 2016 02:56 IST