आर्णी मार्गावरचे ज्वेलर्स : सहायक निबंधकांनी केली कारवाईयवतमाळ : कुठलाही परवाना नसताना सावकारी करणाऱ्या एका ज्वेलर्स मालकाविरोधात सहायक निबंधकांनी धाड टाकून कारवाई केली. दुपारी २ वाजताच्या सुमारास तालुका सहायक निबंधकाचे पथकच या दोन्ही प्रतिष्ठानांवर धडकले.जयंत येरावार यांच्या मालकीचे विनायक ज्वेलर्स आणि विवेक ट्रेडर्स अशी दोन प्रतिष्ठाने आर्णी मार्गावर आहेत. येरावार बंधू अवैध सावकारी करीत असल्याची तक्रार बोथबोडण येथील जितेंद्र राठोड आणि सतीश चव्हाण यांनी सहायक निबंधक कार्यालयात केली. या तक्रारीवरूनच सहायक निबंधक एस.पी. गुघाने यांच्या नेतृत्वात विशेष पथक गठित करण्यात आले. यामध्ये जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहायक निबंधक अर्चना माळवी यासुद्धा होत्या. या पथकाने तब्बल दोन तास दोन्ही प्रतिष्ठानचे कसून झडती घेतली. विनायक ज्वेलर्समधून काही संशयास्पद दस्ताऐवज ताब्यात घेतले. शिवाय चांदीची भांडीही जप्त केली. भरबाजारपेठेत पोलिसांसह ज्वेलर्सच्या दुकानात आलेले पथक पाहून चांगलीच खळबळ निर्माण झाली होती. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणात कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र सहकार विभागाने अवैध सावकारांविरोधात उघडलेल्या या मोहिमेमुळे शहरात चांगलीच दहशत निर्माण झाली. (कार्यालय प्रतिनिधी)
अवैध सावकाराच्या प्रतिष्ठानांवर धाड
By admin | Updated: August 21, 2016 01:28 IST